दि.३०(पीसीबी):पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून मोठा कूटनीतिक संकेत मिळाला आहे. इराण यांनी अमेरिका सोबत चर्चेसाठी तत्त्वतः तयारी दर्शवली असून, ही मध्यस्थी पाकिस्तान मार्फत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये प्रादेशिक महासत्तांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात येत असून, या बैठकीत युद्धविराम आणि तणाव कमी करण्याच्या आराखड्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घडामोडींना अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.
मात्र, इराणने या चर्चेसाठी काही कठोर अटी पुढे केल्या आहेत. सर्वप्रथम, इराणवरील सुरू असलेले हल्ले तात्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, भविष्यात कोणतेही लष्करी हल्ले होणार नाहीत, याबाबत ठोस आणि विश्वासार्ह हमी देण्यात यावी, अशीही अट इराणने ठेवली आहे.
या अटी मान्य झाल्यासच अमेरिका-इराण चर्चेला पुढे नेण्यास इराण तयार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या संभाव्य चर्चेमुळे किमान तात्पुरता युद्धविराम किंवा संघर्षात काही काळासाठी विराम मिळू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, पाकिस्तानची मध्यस्थी भूमिका या संपूर्ण प्रक्रियेत निर्णायक ठरणार असून, प्रादेशिक स्थैर्यासाठी ही एक सकारात्मक पाऊल मानली जात आहे. सर्व संबंधित देशांचे लक्ष आता या बैठकीकडे लागले असून, पुढील काही दिवसांत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.












































