इराणचा इस्रायलवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला; नेतान्याहूंचे भाऊ इद्दो ठार?

0
1

दि.१०(पीसीबी)- मध्यपूर्वेत तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. इराणने इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा नवा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, मोजतबा खामेनेई यांची देशाच्या नव्या सर्वोच्च नेत्यांपदी नियुक्ती जाहीर झाल्यानंतर काही तासांतच हा हल्ला करण्यात आला.

हल्ल्यानंतर इस्रायलची राजधानी तेल अवीवसह अनेक भागांमध्ये एअर रेड सायरन वाजू लागले. इस्रायलच्या अत्याधुनिक संरक्षण यंत्रणांनी येणारी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच अडवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर आणखी एक वाद निर्माण झाला. एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही अप्रमाणित पोस्ट्स व्हायरल झाल्या. त्यामध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे भाऊ इद्दो नेतान्याहू यांचा इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला.

मात्र, या दाव्याबाबत इस्रायली प्रशासन किंवा नेतान्याहू कुटुंबाकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर पसरत असलेल्या या बातम्यांबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.दरम्यान, इराण आणि इस्रायलमधील वाढता संघर्ष जागतिक राजकारणासाठी चिंतेचा विषय ठरत असून पुढील काही तास परिस्थिती कशी बदलते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.