खासगी मिळकतदारासाठी कारस्थान केल्याचा आरोप
पुणे, दि. २४ – भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या चुकीच्या मोजणीने सोसायटीची ये-जा करण्याचा पूर्ण रस्ता दुसऱ्याच मिळकतीत दाखवला गेल्याने बालेवाडीतील २ सोसायट्या संकटात सापडल्या आहेत.भविष्यात या इमारती पाडल्या जाण्याचा आणि ६० कुटुंबाची ये-जा बंद होण्याचा धोका निर्माण झाला असून या संशयास्पद कृतीविरुद्ध संबंधित भू-कर मापक कर्मचाऱ्यावर कारवाई करावी,अशी लेखी तक्रार आणि मागणी सोसायटी पदाधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडे केली आहे. बालेवाडी येथील अमित एमराल्ड पार्क सोसायटी आणि सेलिब्रेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यानी ही तक्रार नोंदवली आहे.खासगी मिळकतदारासाठी हे कारस्थान केल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे २४ मार्च २०२५ रोजी सकाळी साडेअकरा वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत दोन्ही सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली.अमित इम्राल्ड पार्क चे अध्यक्ष डॉ. विजय भिलवाडे,सेलिब्रेशन सोसायटीचे सचिव संतोष छाजेड, राजाराम ढवळे यांच्यासह अनेक पदाधिकारी,फ्लॅट धारक या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
बालेवाडी येथे स. नं ३१/१ मध्ये अमित एमराल्ड पार्क सोसायटी आणि सेलिब्रेशन सोसायटी आहे. इमारती चे नकाशे २००७ आणि २०१० ला महापालिकेकडून मान्य झाले व त्यानंतर बांधकाम होऊन लोकांनी ह्या इमारती मधे सरकारी स्टैम्प ड्यूटी भरून फ्लॅट विकत घेतले व त्याला महापालिकेने भोगवटा पत्र सुद्धा दिले आहे. त्यासाठी आवश्यक त्या सरकारी मोजण्या २००५ आणि २०१० झालेल्या आहेत ,पुणे महापालिकेच्या परवानग्या घेतल्या गेलेल्या आहेत आणि ह्या सर्व इमारती अधिकृत आणि कायदेशीर आहेत. अमित एमराल्ड पार्क चा रस्ता महापालिकेने एफ एस आय स्वरूपात मोबदला देऊन ताब्यात घेतला आहे. काही दिवसांपूर्वी ह्या दोन्ही सोसायटी ने हायकोर्टात महापालिकेच्या विरोधात रस्ता दुरुस्त करून द्यावा असा दावा सुद्धा दाखल केलेला आहे आणि आज भूमीअभिलेख ने रस्ता गायब करून दुसऱ्यालाच देऊन टाकला आहे.
दिनांक ०३-०२-२०२५ रोजी भूमी अभिलेख कार्यालयाचे हद्दीच्या खुणा दाखविणा बद्दल पत्र सेलिब्रेशन आणि अमित इमराल्ड सोसायटीला मिळाले व भूमी अभिलेख चे भूकरमापक व्ही व्ही कोकरे यांनी दोन्ही सोसायटी च्या लोकांना विश्वासात न घेता जागेवर येऊन परस्पर हद्दी दाखवल्या व हा रस्ता दुसऱ्याच्या मिळकती मधे दाखवला व सोसायटीच्या हरकती न नोंदवता व्ही व्ही कोकरे निघून गेले. त्यानंतरसोसायटीनी त्वरित ४ तारखेला हरकत दाखल केल्या. हद्द दाखविण्यासाठी आलेले भुकरमापक व्ही. व्ही. कोकरे यांनी हद्दींची नोंद चुकीच्या पद्धतीने केली आणि सोसायटी चा रस्ता म्हणजे स. नं ३१/१ मधील भाग शेजारच्या खासगी मिळकतीत म्हणजे स. न. २९ मधे दाखविला गेला .त्यामुळे तेवढी जागा आणि रस्ता कागदोपत्री महापालिकेचा भाग राहिलेला नाही व ती मिळकत खासगी झाली आहे. भविष्यात संबंधित मिळकतीचे मालक ती जागा ताब्यात घेऊन अमित एमराल्ड सोसायटीच्या इमारती पाडण्याचा आणि ६० कुटुंबाची ये-जा असलेला रस्ता बंद करू शकतात. त्यामुळे दोन्ही सोसायटयांनी सावध होऊन या मोजणीला आणि चुकीच्या हद्दीला हरकत घेऊन भूमी अभिलेख कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.चुकीची नोंद दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
भू -करमापक व्ही. व्ही. कोकरे यांनी दाखविलेल्या हद्दी चुकीच्या आणि भ्रष्ट पद्धतीने केल्या असल्यामुळे सदर चुकीचे नकाशा ची प्रत कोणालाही देऊ नये, वरिष्ठांनी स्वतः खातरजमा केल्या शिवाय मोजणी प्रक्रिया निकाली काढू नये,सदर नकाशे संपूर्ण रेकोर्ड सहित म्हणजेच गुगल नकाशे, जुन्या मोजणी, टिपण, फाळणी वर्गरे पुन्हा तपासून त्याची वरिष्ठांनी स्वतः खातरजमा करून जागेवर पुन्हा हद्दी दाखविण्यात याव्यात,अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.भुकरमापक व्ही. व्ही. कोकरे यांनी सदर प्रकरणात भ्रष्टाचार करून हद्दी दाखविल्या असल्यामुळे भु-करमापक व्ही. व्ही. कोकरे यांची चौकशी करावी आणि सदर प्रकरण त्यांच्याकडून काढून इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या नावे वर्ग करणेत यावे व नव्याने त्याच्या हद्दी दाखवाव्यात असेही या तक्रारीत म्हटले आहे.
जमाबंदी आयुक्तांनी ह्या गैरप्रकारात स्वतः लक्ष घालावे आणि त्याच बरोबर हा रस्ता महापालिकेने २००८ सालीच ताब्यात घेतलेला आहे त्यामुळे महापालिका आयुक्तांनी जागेवर येऊन पाहणी करून ह्या बाबतीत निर्णय घ्यावा आणि हा रस्ता दुसऱ्यांच्या घशात घालू नये अशी मागणी सोसायटीच्या सभासदांनी पत्रकार परिषदेत केली आहे.