इन्स्टंट लोन ॲप वरील कर्ज भरण्यासाठी पठ्ठ्याने स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव

0
293

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – इन्स्टंट लोन ॲप वरून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी लोन ॲप कंपनीकडून वारंवार तगादा लावला जात होता. ते कर्ज फेडण्यासाठी एका तरुणाने स्वतःचे अपहरण झाले आहे, असा बनाव रचला. त्याने बहिणीला फोन करून अपहरण झाले असल्याचे सांगत पाच लाख रुपयांची मागणी केली. याबाबत बहिणीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी अवघ्या एका तासात हा बनाव उघडकीस आणून तरुणाला ताब्यात घेतले.

विराज विकास देशपांडे (वय 26) असे त्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, 8 फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षात एका महिलेचा फोन आला. विराज विकास देशपांडे याचे दिघी परिसरातून सायंकाळी साडे सहा वाजता तिघांनी अपहरण केले. अपहरणकर्ते पाच लाख रुपये खंडणी मागत असून पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे त्या महिलेने सांगितले.

नियंत्रण कक्षातून याबाबत दिघी पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा युनिट तीन यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कॉल केलेल्या इसमाचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन त्याचे मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करुन शोध सुरू केला. कथित अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे या घटनेबाबात चौकशी केली असता त्याने सुरवातीला उडवाडवीची उत्तरे दिली.

कुठून अपहरण केले अशी विचारणा केली असता त्याने प्रत्येक वेळी वेगवेगळी माहिती दिली. त्यास घटनास्थळावर नेले असता त्याने पोलिसांना उपयुक्त माहिती दिली नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सांगितले कि ‘मी इन्स्टंट कॅश लोन या ॲपवरुन लोन घेतले असून लोन कंपनीचे लोक लोनसाठी वारंवार फोन करुन लोनचे पैसे परत देण्यासाठी विचारणा करत होते. त्यांचे पैसे परत देण्यासाठी एकत्रित मोठी रक्कम मिळावी यासाठी विराज देशपांडे आणि राहुल कुमार यांनी मिळून विराज यांच्या अपहरणाचा बनावट कॉल केला असल्याचे सांगितले. पोलिसांनी अवघ्या तासाभरात हा प्रकार उघडकीस आणला.