इतका दबाव होता की अनिल देशमुख यांनी आत्महत्या केली असती

0
151

सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांमुळे खळबळ माजली आहे. अशातच आता अनिल देशमुख यांच्याबाबत श्याम मानव यांनी एक मोठा दावा केला आहे. अनिल देशमुख जेव्हा राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा ते इतके दबावात होते की आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत गेले होते असंही श्याम मानव यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले आहेत श्याम मानव?
“मविआ सरकारमध्ये मुंबई पोलीस आयुक्तांनी हे पत्र दिलं होतं की १०० कोटी रुपये महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गोळा करायला सांगितले. त्यानंतर त्या आधारावर एका नेत्याने अनिल देशमुख यांच्याकडे चार प्रतिज्ञापत्रं पाठवली. त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही या चारही प्रतिज्ञापत्रांवर सही करा, तर तुम्हाला ईडी चौकशीला सामोरं जावं लागणार नाही. तसंच तुरुंगात जावं लागणार नाही.” असं श्याम मानव म्हणाले.

अशी चार प्रतिज्ञापत्र –
१) उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांनी मातोश्रीवर अनिल देशमुखांना बोलवलं त्यांना पैसे गोळा करायला सांगितले या प्रतिज्ञापत्रावर सही करा.

२) दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात हा उल्लेख होता की आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. हा उल्लेख असलेल्या प्रतिज्ञापत्रावर सही मागितली.

३) तिसरं प्रतिज्ञापत्र अनिल परब यांच्याबाबत होतं, त्यांनी काही बेकायदेशीर बांधकामं आहेत त्या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र आहे त्यावर सही करा.

४) चौथ्या प्रतिज्ञापत्रात अजित पवारांचा उल्लेख होता. अजित पवारांनी देवगिरी बंगल्यावर बोलवलं. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार उपस्थित होते. त्या दोघांच्या उपस्थितीत तुम्हाला (अनिल देशमुख) सांगण्यात आलं आहे की गुटखा विक्री करणाऱ्यांकडून इतके पैसे गोळा करायला सांगितलं आहे. अशा पद्धतीचं चौथं प्रतिज्ञा पत्र होतं. ही माहिती श्याम मानव यांनी दिली. तसंच ते म्हणाले अनिल देशमुख यांच्यावर इतका दबाव होता की त्यांनी आत्महत्या केली असती, असं श्याम मानव म्हणाले.

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर इतका दबाव होता की त्यांनी आत्महत्या केली असती असं श्याम मानव यांनी म्हटलं आहे.
“अनिल देशमुख यांनी या सगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. अनिल देशमुखांवर इतका दबाव होता, कुटुंबाचा प्रश्न होता, त्यांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न होता. त्यांनी या प्रश्नी खूप विचार केला, त्यानंतर निर्णय घेतला की माझ्यामुळे तीन निरपराध माणसं तुरुंगात जातील, हे आपल्याला मान्य नाही. त्यावेळी ते अशा पर्यायापर्यंत आले होते की आत्महत्या करावी. पण त्यांनी सुदैवाने तसं पाऊल उचललं नाही. त्यांनी कुठल्याही प्रतिज्ञापत्रावर सही केली नाही. ज्यानंतर पुढील चौकशी केली आणि अनिल देशमुख यांना तुरुंगवास भोगावा लागला. अनिल देशमुख यांनीही हे सांगितलं आहे की ते आत्महत्या करण्याच्या विचारात होते. १०० टक्के हेच घडलं आहे की याची मला खात्री आहे.” असं श्याम मानव म्हणाले.