दि. २० ऑगस्ट (पीसीबी ) मोशी,
मोशी परीसातील एका आश्रमात शिकणारे विद्यार्थी इंद्रायणी नदीची पूजा करण्यासाठी घाटावर गेले. तिथे पूजा करत असताना एकजण पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले तिघेजण पाण्यात बुडाले. ही दुर्दैवी घटना सोमवारी (दि. 19) सकाळी मोशी येथील तापकीर वस्ती येथे घडली. त्यातील एकाला तात्काळ बाहेर काढण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पाण्यात बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सोमवारी दुपारी मिळाला. तर तिसऱ्या मुलाचा शोध घेण्यासाठी मंगळवारी (दि. 20) पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. मंगळवारी सकाळी तिसऱ्या मुलाचा मृतदेह सापडला.
जय ओमप्रकाश दायमा (वय 19, रा. वनी, नाशिक) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ओंकार श्रीकृष्ण पाठक (वय 16, रा. पद्मावती गल्ली, लातूर), प्रणव रमाकांत पोतदार (वय 17, रा. खर्डा आष्टी, बीड) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. त्यातील ओंकार याचा मृतदेह सोमवारी सापडला. तर प्रणव याचा मृतदेह मंगळवारी सकाळी सापडला.
याबाबत माहिती अशी की, मोशी परिसरात वैदिक विद्यालय येथे शिकणारे 71 विद्यार्थी श्रावणी उपाकर्म करीता सोमवारी सकाळी इंद्रायणी नदी मोशी येथे आले होते. त्यातील एकजण पूजा करताना इंद्रायणी नदीत पडला. त्याला वाचविण्यासाठी ओमकार, प्रणव आणि त्यांचे तीन मित्र गेले. मात्र पाण्यात पडलेल्या मुलाला वाचवताना जय, ओमकार आणि प्रणव हे पाण्यात बुडाले. इतर दोघेजण वाचले.
जय याला तात्काळ बाहेर काढण्यात आले. त्याला उपचारासाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर दोघांचा नदीत शोध घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाची पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर एनडीआरएफ, पिंपरी-चिंचवड आपत्ती व्यवस्थापन विभाग, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि आळंदी येथील एक पथक घटनास्थळी दाखल झाले.
दुपारी दोन वाजताच्या सुमारास बुडालेल्या दोघांपैकी ओमकार याच मृतदेह वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या पथकाला आढळला. सोमवारी प्रणव पोतदार याचा मृतदेह सापडला नाही. अंधार पडल्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली. मंगळवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू केली असता एनडीआरएफच्या पथकाला प्रणव याचा मृतदेह सापडला.