आळंदी, दि. २८ (पीसीबी) : आळंदी मध्ये इंद्रायणी नदीत एका महिला पोलिसाने रविवारी (दि. 25) सायंकाळी सव्वा पाच वाजता उडी मारली. त्यानंतर वेगवेगळ्या शोध पथकांकडून इंद्रायणी नदीत शोध मोहीम राबविण्यात आली. अखेर तीन दिवसानंतर पोलीस महिलेचा मृतदेह गोलेगाव येथे आढळून आला.
अनुष्का सुहास केदार (वय 20 वर्षे, रा. लक्ष्मीनारायण नगर, दिघी) असे या पोलीस महिलेचे नाव आहे.
आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या त्या सध्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे नेमणुकीस होत्या. त्यांनी रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी मारली.
मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. रविवारी सायंकाळी आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन विभागाला पाचारण केले. अंधार पडल्याने रविवारी शोधकार्य थांबवण्यात आले. सोमवारी आणि मंगळवारी पुन्हा शोधकार्य करण्यात आले आहे. आळंदी पोलीस, आळंदी अग्निशमन विभाग, एनडीआरएफ यांच्या पथकाकडून इंद्रायणी नदीत शोधकार्य केले. अखेर बुधवारी पोलीस महिलेचा मृतदेह गोलेगाव येथे आढळून आला.