इंद्रायणी नदीत आणखी एका महिलेची उडी

0
88

आळंदी, दि. 29 (पीसीबी)

आळंदी येथे इंद्रायणी नदीत एका पोलीस महिलेने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मागील चार दिवसांपूर्वी घडली. त्या महिलेचा मृतदेह बुधवारी सकाळी सापडला. त्यानंतर गुरुवारी (दि. 29) सकाळी आणखी एका महिलेने इंद्रायणी नदीत उडी मारल्याची घटना समोर आली आहे.

आळंदीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास एका महिलेने इंद्रायणी नदीत उडी मारली. आळंदी येथील पीएमटी बस स्टॉप शेजारी असलेल्या पुलावरून महिलेने उडी मारली. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अग्निशमन विभाग तसेच बचाव पथकांना पाचारण केले.

नदीत उडी मारणाऱ्या महिलेची ओळख अद्याप पटली नाही. महिलेचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

मागील पाच दिवसातील दुसरी घटना

रविवारी एका पोलीस महिलेने आळंदी येथील गरुड खांब परिसरातून इंद्रायणी नदी उडी मारली. त्यानंतर सलग तीन दिवस वेगवेगळ्या पथकांकडून त्या महिलेचा शोध घेण्यात आला. अखेर तीन दिवसानंतर आळंदीपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर गोलेगाव येथे महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेतून आळंदी पोलिसांनी निःश्वास सोडला असताना लगेच दुसऱ्या दिवशी आणखी एका महिलेने इंद्रायणी नदीत उडी मारली. पोलीस आणि वेगवेगळ्या पथकांकडून याही महिलेचा शोध घेतला जात आहे.