देहू,दि.२५(पीसीबी) – पोकलेनच्या साहाय्याने इंद्रायणी नदीतून अवैधरित्या वाळू उपसा केल्याप्रकरणी देहूगाव तलाठी कार्यालयाने छापा मारून कारवाई केली. त्यात दोघांना अटक करण्यात आली असून ६९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. २४) पहाटे तीन वाजता वसंत बंधारा देहूगाव येथे करण्यात आली.
तलाठी सूर्यकांत लक्ष्मण काळे यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज गोविंद काशीद (वय २२, रा. तळेगाव दाभाडे), प्रशांत रंगनाथ किरवे (वय २९, रा. तळेगाव दाभाडे, दोघे मूळ रा. अहमदनगर), सोनू छोटेलाल शर्मा (वय ३३), खाडे (वय २४), अमोल उर्फ आण्णाप्पा हणमंतराया जमादार (वय २९, सर्व रा. तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूगाव येथील वसंत बंधाऱ्याजवळ इंद्रायणी नदीपात्रात काहीजण अवैधरित्या वाळूउपसा करत असल्याची माहिती तलाठी कार्यालयास मिळाली. त्यानुसार शनिवारी पहाटे तीन वाजता छापा मारून कारवाई करण्यात आली. दोन पोकलेनच्या साहाय्याने ट्रॅक्टर मधून वाळू उपसा करून नेत असताना पाचजण आढळले. त्यातील सुरज काशीद आणि प्रशांत किरवे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पोकलेन आणि दोन ट्रॅक्टर असा ६९ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.