भोसरी, दि. १९ (पीसीबी) : एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी येथे इंद्रायणी नदीच्या काठी सुरू असलेल्या दारूभट्टीवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारून कारवाई केली. ही कारवाई शनिवारी (दि. 17) सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस अंमलदार विजय दौंडकर यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने 9 हजार 800 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी रसायन तयार केले. या भट्टीबाबत अमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास दारू भट्टीवर छापा मारला. या कारवाईमध्ये एक लाख 96 हजार 130 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.