दि.१६(पीसीबी)-भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ८ इंद्रायणीनगर –बालाजीनगर येथे सुरू असलेल्या मतमोजणीदरम्यान गंभीर घोळ समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सीमा सावळे यांनी मतमोजणी प्रक्रियेवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
प्राथमिक मोजणीत सुमारे ३०० मतांचा फरक दिसून आला होता. मात्र पुढील फेरीत हा फरक २७४ मतांपर्यंत कमी झाल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे मतमोजणीदरम्यान दोन ईव्हीएम मशीन अचानक रिस्टार्ट झाल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेनंतर सीमा सावळे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अधिकृत आक्षेप नोंदवत मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पुन्हा तपासण्याची मागणी केली आहे. मशीन रिस्टार्ट होणे ही गंभीर बाब असून यामुळे निकालावर परिणाम होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, निवडणूक प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून सर्व प्रक्रिया नियमांनुसार झाल्याचा प्राथमिक दावा करण्यात येत आहे. मात्र उमेदवाराच्या आक्षेपामुळे इंद्रयनीनगरातील मतमोजणीवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.आता या प्रकरणावर निवडणूक आयोग काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









































