इंद्रायणीनगरचे १०० मतदारांची नावे गायब, प्रत्येक प्रभागात समस्या असल्याने हजारो मतदार वंचित

0
3

पिंपरी, दि.२७ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मतदार यादीत प्रचंड मोठे घोळ समोर आले आहेत. मतदार यादीचे प्रारुप प्रसिध्द केल्यानंतर पडताळणीत या सर्व चुका समोर आल्याने कार्यकर्ते त्रस्त आहेत. नावांची घुसखोरी, परस्पर नावे वगळणे, पत्ते चुकिचे, नावांत बदल, एकाच मतदाराची तीन-चार वेगवेगळ्या क्रमांकाची ओळखपत्र असे प्रकार उघडकिस आलेत. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे मतदारांची नावे कोणत्याही यादित नसल्याचे दाखले समोर आल्याने खळबळ उडाली आहे. इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक ८ मध्ये तब्बल १०० मतदारांची नावे गायब असून ती दुसऱ्या कोणत्याही यादीत नसल्याने या मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा गुन्हा घडला आहे. दरम्यान, अशा प्रकारे शहरातील ३२ प्रभागांतून सरासरी ३०-४० मतदारांची नावे कायमची गहाळ झाल्याने लोकशाहि वचविण्यासाठी मतदानाची तळमळ असणाऱ्या मतदारांना त्यांचा हक्क बजावता येणार नाही, अशी चर्चा आहे.
प्रभाग क्रमांक ८ मधील मतदार यादीमधील सुमारे १०० नावांचा आतापता लागत नसल्याचे स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष सिमाताई सावळे यांनी निवडणूक विभागाच्या निदर्शनास आणून दिले. अशा प्रकारे शहरातील बहुसंख्य प्रभागांतून मतदारांची नावे गायब असल्याने लोकशाहितील पवित्र कार्य म्हणून मतदान करू पाहणाऱ्या या नागरिकांना मतदानापासून वंचित रहावे लागणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चिंचवडची नावे चिंचवड स्टेशनच्या यादीत, तळवडे प्रभागाची नावे चिखली प्रभागात, खराळवाडीच्या यादित पिंपरी कँम्पची नावे, पिंपरी चौकातील महिंद्रा सोसायटीतील मतदारांची नावे इंद्रायणीनगरच्या प्रभाग यादीत, पिंपळे सौदारची नावे पिंपळे निलख असे असंख्य घोटाळे समोर आले आहेत. यादीतून सरासरी १०-१५ टक्के मतदारांच्या नावांचा घोळ कायम आहे. महापालिका निवडणूक शाखेने मतदार यादी तयार करताना आयोगाकडे बरोबर यादी पाठवली होती, पण त्याची छपाई होताना नावे गायब झाली असावीत, असाही संशय आहे.

शहरातील एकूण १७ लाख १३ हजार मतदारांपैकी ३ लाख ६३ हजार मतदारांचे घर क्रमांक गायब आहेत. नऊ प्रभांगतून २५ टक्क्यांपेक्षा अधइक मतदारांचे पत्ते नाहीत. प्रभाग २१ मध्ये ३३ टक्के मतदारांचे घर क्रमांक दिलेले नाहीत. प्रभाग १० मध्ये २८ टक्के, प्रभाग ३० मध्ये २७ टक्के, प्रभाग ४ मध्ये २९ टक्के मतदारांचे घर क्रमांक नाहीत. प्रभाग ५,६,१९, २०, २९ च्या यादीत २६ टक्केहून अधिक मतदारांचे पत्ते दिलेले नाहीत.
सदोष मतदार यादिमुळे गेल्या निवडणुकितही असंख्य मतदारांना आपल्या हक्कापासून वंचित राहिले. अनेकांना यादीत आपले नाव नसल्याचे मतदानाच्या दिवशी लक्षात येते. सर्व राजकीय पक्षांनी दबाव निर्माण केल्याने आता मतदार यादी प्रारुप जाहिर केल्यावर हरकती घेण्याची मुदत २७ नोव्हेंबर पर्यंत होती ती आता ३ डिसेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.