इंदोरीच्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी दिले खासदार बारणे यांना धन्यवाद

0
69

संपादित जमिनीसाठी मिळणार दीडपट मोबदला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशामुळे शेतकऱ्यांना मिळाला न्याय

चिंचवड, दि. 10 (पीसीबी) – संपादित हंगामी बागायती जमिनीसाठी दीडपट परतावा मिळवून दिल्याबद्दल मावळ तालुक्यातील इंदोरी गावातल्या रिंगरोड बाधित शेतकरी बांधवांनी आज खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन त्यांना विशेष धन्यवाद दिले.

खासदार बारणे यांनी गेल्या महिन्यात शेतकऱ्यांसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यावेळी रिंग रोड बाधित समस्त शेतकऱ्यांना दीड पट परतावा मिळावा अशी मागणी करणारे निवेदन दिले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी ताबडतोब ती मागणी मान्य करून त्यानुसार आदेश काढण्याच्या सूचना महसूल विभागास दिल्या होत्या. त्यानुसार महसूल विभागाने दीडपट परताव्याबाबत आदेश जारी केला आहे.

संपादित जमिनीच्या दीडपट परताव्याची मागणी मंजूर झाल्याने इंदोरीतील ग्रामस्थांनी व शेतकरी बांधवांनी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे यांच्या नेवृत्वाखाली खासदार बारणे यांची भेट घेऊन आभार मानले. बारणे यांना मिठाई भरवून त्यांचा सत्कार केला.

आकुर्डी व नाणोली तर्फे चाकण व सुदवडी या लगतच्या गावांप्रमाणेच इंदोरीतील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनाही हंगामी बागायत जमिनीला जिरायती जमिनीच्या दीडपट परतावा तर बागायत जमिनीला दुप्पट परतावा मिळावा तसेच संमतीसाठी शेतकऱ्यांना दिलेली 31 जुलै 2024 ची मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी करणारे निवेदन खासदार बारणे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले व राज्यातील महायुती शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.

इंदोरीच्या शेतकऱ्यांची मागणी मान्य करून त्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल खासदार बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.