इंदोरीकर महाराज आज पुन्हा न्यायालयात…! वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अडचणी वाढणार

0
370

संगमनेर,दि.०८(पीसीबी) – अपत्य प्राप्तीबद्दल वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्यावर दाखल गुन्ह्याची आज संगमनेर न्यायालयात सुनावणी होणार आहे. समन्स न मिळाल्याने मागील महिन्यातील सुनावणीसाठी इंदोरीकर महाराज गैरहजर होते. आजच्या सुवणीसाठी ते स्वतः हजर राहून जामिनासाठी अर्ज करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. अपत्य प्राप्तीबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना आता पुन्हा कोर्टात हजर रहावं लागणार आहे. २०२० साली दाखल झालेल्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. पण अंधश्रद्धा निर्मूलन समीती आणि राज्य सरकारने या निर्णयाला आव्हान देत हायकोर्टात धाव घेतली.

हायकोर्टाने हा खटला जिल्हा न्यायालयात पुन्हा चालवण्याचा आदेश दिला होता. तोच आदेश सुप्रिम कोर्टानेही कायम ठेवल्याने इंदोरीकर महाराजां विरोधात संगमनेर कोर्टात हा खटला नव्याने सुरू झाला आहे. गेल्या महिन्यात कोर्टाने समन्स बजावले होते. मात्र इंदोरीकर महाराज भेटले नाही असा रिपोर्ट पोलिसांकडून कोर्टात सादर करण्यात आला होता. या प्रकरणाची आज पुन्हा सुनावणी होणार असून इंदोरीकर आज कोर्टात हजर राहाणार का? आणि त्यांच्या जामिनाबाबत काय होते? याचा निर्णय आजच्या सुनावणीत होण्याची शक्यता आहे.