“इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंज” स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीला पुरस्कार

0
249

बँगलोर येथे पुरस्काराचे वितरण; स्पर्धेतील स्टेज २ मध्ये पिंपरी चिंचवडची निवड

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) : देशभरात चालणे आणि सायकलिंगचे परिवर्तन/बदल घडविणे आणि स्ट्रीट डिझाईन प्रकल्पांच्या प्रगतीला गती देण्यासाठी स्मार्ट सिटीज मिशन, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय MoHUA, ITDP, USA आणि बेंगळुरू स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ७ व ८ जुलै २०२२ रोजी पहिल्या ‘हेल्दी स्ट्रीट्स कॅपॅसिटी बिल्डिंग वर्कशॉप’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये, इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंज स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीला जाहिर झालेल्या पुरस्काराचे वितरण स्मार्ट सिटीज मिशनचे सहसचिव आणि अभियान संचालक कुणाल कुमार, स्मार्ट सिटीज मिशन संचालक राहुल कपूर यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, उपअभियंता सुनील पवार यांनी हा पुरस्कार स्विकारला. तसेच, पिंपरी चिंचवडचा स्टेज २ मध्ये सहभाग झाल्याचे यावेळी जाहिर करण्यात आले. या देशपातळीवरील पुरस्कारामुळे पिंपरी चिंचवडच्या ‍शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

कर्नाटक सरकारचे नगर विकास मंत्री बिरथी बसवराज, अतिरिक्त मुख्य सचिव आणि आयुक्त नागरी भू वाहतूक संचालनालय सुश्री मंजुला व्ही, अतिरिक्त मुख्य सचिव (नागरी विकास विभाग) आणि बेंगळुरू स्मार्ट सिटीचे अध्यक्ष राकेश सिंह, बेंगळुरू स्मार्ट सिटी व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चोलन, कर्नाटक अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अँड फायनान्स कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रीमती दीपा चोलन आदी मान्यवर उपस्थित होते.

शहरांमध्ये उच्च दर्जा असलेल्या रस्त्यांची रचना आणि त्यांचा अधिकाधिक लोकोपयोगात वाढ कशी होवू शकते, यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्मार्ट सिटीज मिशनने बंगळुरू येथे दोन दिवसीय पहिल्या “हेल्दी स्ट्रीट्स कॅपॅसिटी बिल्डिंग वर्कशॉप” आयोजित केला होता. यामध्ये, प्रकल्प – तज्ञांचे सादरीकरण आणि विविध शहराच्या अधिकार्‍यांशी पॅनेल चर्चेद्वारे विचार मांडण्यात आले. यामध्ये, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्यावतीने कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, उपअभियंता सुनील पवार, सल्लागार आशिक जैन यांनी सहभाग नोंदविला होता. कार्यशाळेमध्ये देशातील ३७ शहरांतील १०० हून अधिक अधिकारी- मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अभियंते सहभागी झाले होते. उद्घाटन प्रसंगी बेंगळुरू स्मार्ट सिटी द्वारे चालणे आणि सायकलिंग परिवर्तनाचा प्रवास व्हिडिओद्वारे दाखविण्यात आला. तसेच, कार्यक्रमात आयटीडीपी इंडियाने तयार केलेल्या इन्फोग्राफिक – आरोग्यदायी मार्ग बनविणा-या “१० गोष्टी”चे अनावरण देखील करण्यात आले. इंडिया सायकल्स 4 चेंज आणि स्ट्रीट्स 4 पीपल चॅलेंजच्या स्टेज १ मधील पहिल्या १५ शहरांना सन्मानित करून स्टेज १ फ्रंट रनर पुरस्कार देण्यात आले. “वॉकिंग अँड सायकलिंग” चॅम्पियन- तज्ञ, संस्था, सीएसओ आणि व्यक्तींचाही या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. सर्वांगीण “सस्टेनेबल मोबिलिटी” पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी शहरांमध्ये आघाडीचा धावपटू / ज्युरी विशेष उल्लेख केल्याबद्दल पुरस्कृत करण्यात आले.

या पुरस्काराबाबत मत व्यक्त करताना आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, अशा उपक्रमांच्या माध्यमातून चालणे आणि सायकल चालवणे यापेक्षा अधिक स्वच्छ हवा आणि वाहतुकीच्या अनेक पद्धतींसह शहराचा अनुभव घेण्याची संधी प्राप्त होते. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. तसेच, सक्रिय जीवनशैली असलेल्या शहरांमध्ये अधिक गुंतवणूक, प्रतिभा असते आणि त्यांच्याकडे नागरिकांसाठी अधिक पर्याय असतात. पर्यावरण जागरूकता साठी नाविन्यपूर्ण विचार करायला हवा, समस्यांवर उपाय शोधून त्यांची अंमलबजावणी करायला हवी. ” शहरव्यापी परिवर्तन वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटी द्वारे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच केंद्र सरकारच्या अशा योजनेतून पिंपरी चिंचवड शहर लोकोपयोगी विकास साधील असे नमुद केले.