दि.१७(पीसीबी) – इंडियन म्युझिकल क्लब आणि लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी – २ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लायन्स दीप – संध्या’ या अवीट गोडीच्या मराठी गीतांच्या सुरेल मैफलीने गुरुवार, (दि.१६) रोजी रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दीपावलीच्या पूर्वसंध्येला रसिक श्रोत्यांच्या कानामनात स्वरदीप प्रज्वलित केले. राखी झोपे यांची संकल्पना आणि अनिल झोपे यांच्या संयोजनातून साकार झालेल्या या सांगीतिक मैफलीचा प्रारंभ दीपप्रज्वलन तसेच युवतींनी सादर केलेल्या नृत्यातून गणेश, आदिशक्ती स्तवन आणि दीपावली शुभेच्छांच्या माध्यमातून करण्यात आला.
लायन विजय सारडा, राजेंद्र आगरवाल, बी. एल. जोशी,राजेंद्र गोयल, हिरामण राठोड, मुकुंद आवटे, उज्ज्वला कुलकर्णी या प्रमुख मान्यवरांची तसेच लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी – २ मधील सुमारे ३५ क्लब्जच्या पदाधिकाऱ्यांची प्रेक्षागृहात उपस्थिती होती. सुनील सांडगे, गौरी पाटील, ओंकार पटवर्धन, नम्रता सारडा, राजकुमार सुठंवाल, मीरा भावे, नरेंद्र इचे, स्वाती केसकर, आशुतोष ठाकूर, प्राची कर्णिक, शहाजी कांबळे, सदानंद भोसले, विनोद इनामदार, आदिती खटावकर, मंगेश उमराणी आणि अनिल झोपे या गायक कलाकारांनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
या सांगीतिक मैफलीत ‘तुज मागतो मी आता…’ , ‘कानडा राजा पंढरीचा…’ , ‘धुंदी कळ्यांना…’ , ‘ , ‘मला वेड लागले प्रेमाचे…’ , ‘या जन्मावर…’ , ‘शुक्रतारा मंदवारा…’ , ‘संधीकाली या अशा…’ , ‘येशील येशील…’ , ‘पाहिले न मी तुला…’ , ‘चंद्रा…’ , ‘हे चिंचेचे झाड…’ , ‘चिंब पावसानं…’ , ‘दिसला गं बाई दिसला…’ , ‘रुपेरी वाळूत…’ , ‘रेशमाच्या रेघांनी…’ , ‘सजणी गं…’ , ‘ही चाल तुरू तुरू…’ , ‘मी डोलकर…’ , ‘राजा ललकारी…’ , ‘राधा ही बावरी…’ , ‘येऊ कशी प्रिया…’ , ‘ही गुलाबी हवा…’ , ‘चोरीचा मामला…’ अशा एकाहून एक सुंदर गीतांना श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. गीतांच्या ठेक्याला टाळ्यांची साथ देत अन् वन्स मोअरची मागणी करीत असलेल्या रसिक श्रोत्यांना लावणीवर नृत्य करण्याचा मोह आवरता आला नाही. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफलीचा समारोप ‘झिंग झिंग झिंगाट…’ या भन्नाट गीताने करण्यात आला. वाल्टस् बॅंडसोबत वादक कलाकारांची नेटकी साथसंगत, सुरेल कोरस आणि प्रा. दिगंबर ढोकले यांचे खुमासदार निवेदन यामुळे मैफल अधिकच रंगतदार झाली.