इंजिनिअर पतीवर काळी जादू केल्याप्रकरणी उच्चशिक्षित पत्नीविरुद्ध फौजदारी

0
319

पुणे, दि.२४ (पीसीबी): पत्नीने आपल्यावर काळी जादू करून मानसिक व शारीरिक छळ केल्याचा पतीचा अर्ज न्यायालयाने दाखल करून घेऊन या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून घेतला आहे. या प्रकरणातील पती सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, आपणास न्याय मिळावा म्हणून त्याने उच्चशिक्षित एम.इ. कॉम्पुटर पत्नी, जवळचे नातेवाईक, दोन तांत्रिक बाबा आणि इतरांवविरुद्ध पुण्यातील प्रथम वर्ग महानगर न्यायदंडाधिकारी कोर्टात धाव घेतली आहे.

पुण्यातील एका नामवंत कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणारे प्रवीण यांनी पत्नीविरुद्ध कुटुंब न्यायालयात घटफोस्टासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र, आपल्या मोबाईलमध्ये पतीने हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर टाकून माझे कॉल रेकॉर्डिंग कौटुंबिक न्यायालयात सादर केले आणि माझ्या खासगी आयुष्याचा भंग केला, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार पत्नी माधुरी बगडाने हिने पुणे पोलिसात दाखल केल्यानंतर पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यामुळे या प्रकरणाला निराळीच कलाटणी मिळाली होती. मात्र पत्नी नेहमी माझ्याविरुद्ध वागते, पती आणि पत्नी दोघांच्या कौटुंबिक नातेसंबंधांना बाधा येईल, असे तिचे वर्तन असते, त्याबाबत तिला वारंवार सूचना देऊनही तिच्यात सुधारणा होत नव्हती.

पत्नी तिची आई आणि जवळचे नातेवाईक हे पती आणि त्याचे नातेवाईक यांच्या अंतर्वस्त्र घेऊन तसेच निंबु, मिरची, कोळसा, काळी बाहुली व इतर वस्तू घेऊन तांत्रिक बाबाच्या मदतीने अघोरी कृत्य करत होते तसेच पत्नी पतीच्या जेवणात आणि पाण्यात विषारी पदार्थ मिसळून शारीरिक व मानसिक त्रास देत होती. पतीची तब्बेत वारंवार बिघडल्या मुळे आणि पत्नी काळी जादू करतेय हे लक्षात आल्यावर पतीला ठोस पुरावे मिळवण्यासाठी नाइलाजाने तिच्या मोबाईलचे रेकॉर्डिंग मिळवावे लागले. त्यात अनेक धक्कादायक बाबी सापडल्या. त्यामुळे पत्नीविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार पोलिसात दाखल केली; मात्र पोलिसांनी तिची दखल न घेतल्यामुळे पतीने न्यायालयात अर्ज दाखल केला.

या अर्जाची दखल घेताना, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. निमसे यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे, की “अर्जदाराची पत्नी तिच्या नातेवाईकांच्या मदतीने त्याच्यावर जादूटोणा करत होती. तो २०१३ च्या ‘नरबळी आणि इतर अमानवी प्रथा, भुताटकी आणि अघोरी प्रकार तसेच काळी जादू निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा आहे. यासंदर्भात अर्जदाराने पोलिसांकडे तक्रार केली होती, परंतु तिची दखल घेतली नाही, असे अर्जदाराने या कोर्टासमोर केलेल्या अर्जात म्हटले आहे. तसेच या प्रकरणी सीआरपीसी १५६(३) अन्वये पोलिसांना चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणीही केली आहे.’’
आपल्या तक्रारीच्या पुष्ट्यर्थ अर्ज़दाराने दाखल केलेला दस्तऐवज पुरेसा असल्याने, सध्या वेगळ्या चौकशीची गरज नाही, असे आमचे मत बनले आहे, असे नमूद करून हे प्रकरण फौजदारी कायद्याच्या कलम २०० नुसार पुढे चालवण्याची अनुमती देतानाच, या प्रकरणी प्रतिवादी माधुरी, शैलेश बगडाने, आशा , विशाखा व मोरवाला तांत्रिक बाबा व अन्य दोघे यांचेवर फौजदारी कायद्यातील कलम ‘महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम 2013’ व तसेच कलम 120 ब, 406, 324, 328 , 506, 34 नुसार नियमित गुन्हेगारी केस दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ऍड पप्पू मोरवाल यांनी अर्जदाराची बाजू मांडली.