आशिया चषकात भारताची UAE विरुद्ध लढाई

0
5

दि. १० (पीसीबी) – आशिया चषक स्पर्धा 2025 मध्ये आज भारत आपला पहिला सामना संयुक्त अरब अमिरात विरुद्ध खेळणार आहे. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारताची धुरा सूर्यकुमार यादवकडे आहे. आशिया चषकाला काल अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग सामन्याने सुरुवात झाली. अफगाणिस्तानने विजय मिळवून स्पर्धेला जल्लोषात सुरुवात केली. आता आज भारतही विजयी सलामी देऊन आगेकूच करण्याच्या तयारीत आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ कोणत्या 11 खेळाडूंसह मैदानात उतरणार याची उत्सुकता आहे.

कारण शुभमन गिलच्या एन्ट्रीने सलामीवर संजू सॅमसनचं स्थान धोक्यात आलं आहे. पण संजूची आम्ही योग्य खबरदारी घेऊ असं सूर्यकुमार यादवने सांगितलं होतं. त्यामुळे विकेटकीपर कोण, सलामीला कोण, तिसऱ्या नंबरवर कोण, फिरकीपटू किती, वेगवान गोलंदाज किती असे अनेक प्रश्न आहेत. भारत आजचा सामना केवळ सराव सामना म्हणून पाहिल कारण टीम इंडियाची खरी कसोटी पाकिस्तानविरुद्ध 14 तारखेच्या सामन्यात लागणार आहे.
भारत-यूएई सामने

आंतरराष्ट्रीय टी 20 स्पर्धेत भारत आणि यूएई संघ एकदाच आमने सामने आले आहेत. आशिया चषकात 2016 मध्ये झालेल्या या सामन्यात भारताने 9 विकेट्स राखून विजय मिळवला होता. दुसरीकडे दोन्ही संघात तीन वन डे सामने झाले. या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला होता.
दुबईची खेळपट्टी

दुबईची खेळपट्टी चकीत करणारी आहे. कारण फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी संतुलित आहे. यावेळी खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देणारी ठरू शकते. त्यामुळे बुमराहसोबत आणखी एक स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज भारतीय टीम खेळवू शकते.
संजू सॅमसन की जितेश शर्मा?

भारताच्या प्लेईंग 11 बद्दल सर्वांना उत्सुकता आहे. संजू सॅमसन खेळणार की टीम इंडिया जितेश शर्माला संधी देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. संजू सॅमसन हा आतापर्यंत अभिषेक शर्माच्या साथीने सलामीला उतरत होता. मात्र आता शुभमन गिलच्या समावेशाने संजूची जागा डळमळीत झाली आहे. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा डावाची सुरुवात करु शकतात. त्यामुळे जितेश शर्माला फिनिशर म्हणून संघात स्थान मिळू शकतं.
नंबर 8 वर कोण?

टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये जसे सलामीला शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा येईल. अशा परिस्थितीत, तिसरे स्थान कायम आहे परंतु तिलक वर्माने या स्थानावर खूप चांगली कामगिरी केली आहे. ज्यामुळे तो टी-२० जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. यानंतर अष्टपैलू खेळाडूंची संख्या येते ज्यामध्ये हार्दिक पंड्या महत्त्वाचा आहे. शिवाय शुभम दुबेचा नंबर लागू शकतो. कारण शुभम दुबे हा गोलंदाजीचा पर्याय आहे, शिवाय संथ खेळपट्टीवर मोठे फटके मारुन तगडा फिनिशरची भूमिका बजावू शकतो. यानंतर मग अक्षर पटेल आणि विकेटकीपर फलंदाज म्हणून जितेश शर्मा अशी भारताची दीर्घ आणि भक्कम फलंदाजी क्रम दिसू शकतो.
भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा, हर्षित राणा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.
आशिया चषकासाठी भारतीय संघ 

फलंदाज : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग.
अष्टपैलू : हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल.
यष्टिरक्षक : संजू सॅमसन, जितेश शर्मा.
गोलंदाज : जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा.
आशिया कपमधील भारताचे वेळापत्रक 

10 सप्टेंबर – विरुद्ध यूएई (दुबई)
14 सप्टेंबर – विरुद्ध पाकिस्तान (दुबई)
19 सप्टेंबर – विरुद्ध ओमान (अबू धाबी)

आशिया कप 2025 – संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज)

9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई
11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान
13 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
15 सप्टेंबर – यूएई विरुद्ध ओमान
15 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई
18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान