भारतीय वंशाचे आणि अमेरिकेत कार्यरत असलेले ग्रेडियंट या स्टार्टअपचे सीईओ अनुराग वाजपेयी सध्या मोठ्या वादात अडकले आहेत. एका उच्चभ्रू वेश्यालय प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून, न्यायालयीन दस्तऐवजांनुसार त्यांनी आशियाई महिलांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी तासाला ५०,००० रुपये ($600) देत असल्याचे समोर आले आहे.
अनुराग वाजपेयी (Anurag Vajpayee) हे अमेरिकेतील जल शुद्धीकरण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नावाजलेले उद्योजक मानले जात होते. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला समोर आलेल्या एका वेश्याव्यवसाय घोटाळ्यात त्यांचे नाव उघडकीस आले. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये ३० पेक्षा अधिक डॉक्टर, वकील, सरकारी अधिकारी यांचा समावेश असून, त्यापैकी एक नाव अनुराग वाजपेयी यांचे असल्याचे वृत्त आहे. या वेश्यालयातून सेवा घेणाऱ्या ग्राहकांनी प्रति तास $600 म्हणजेच जवळपास ५०,००० रुपये मोजले होते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या वेश्यालयात काम करणाऱ्या महिलांमध्ये बहुतांश आशियाई होत्या आणि त्यांना लैंगिक तस्करीच्या जाळ्यातून या ठिकाणी आणल्याचेही उघड झाले आहे. आरोपींच्या नावांची यादी समोर आल्यानंतर संबंधित कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ग्रेडियंटमधील काही कर्मचाऱ्यांनी वाजपेयी यांना त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. यावर कंपनीने निवेदन जारी करत न्यायप्रक्रियेवर विश्वास असल्याचे म्हटले आहे.
प्रसिद्ध तंत्रज्ञ; आता आरोपांच्या भोवऱ्यात-
अनुराग वाजपेयी (Anurag Vajpayee) यांचा जन्म भारतात लखनऊ येथे झाला. त्यांनी लखनऊमधील ला मार्टिनियर कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर २००८ आणि २०१२ मध्ये एमआयटी (Massachusetts Institute of Technology) मधून अनुक्रमे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स आणि पीएचडी पूर्ण केली. त्यांची कंपनी ‘ग्रेडियंट’ एमआयटीमधून सुरू झाली आणि आज तिचे मूल्य १ अब्ज डॉलर्सच्या पुढे गेले आहे.
ग्रेडियंट कंपनी सध्या २५ हून अधिक देशांमध्ये कार्यरत असून, फार्मास्युटिकल्स, सेमीकंडक्टर आणि विविध उद्योगांना पाण्याचे उपाय प्रदान करते. कंपनीकडे २,५०० हून अधिक ऑपरेटिंग सुविधा आहेत. वाजपेयी यांचे नाव एकेकाळी ‘सायंटिफिक अमेरिकन’च्या टॉप १० वर्ल्ड-चेंजिंग आयडियाजमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, सध्या ते गंभीर आरोपांमुळे चर्चेत आहेत.