आळंदी पोलीस ठाण्यातील दोन कक्षांचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते उद्घाटन

0
113

आळंदी , दि.२९ – आळंदी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कक्ष आणि ठाणे अंमलदार कक्ष या दोन कक्षांचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 27) उद्घाटन झाले. आयजीडब्ल्यू इंडिया टेक्नोलॉजी प्रा ली आणि एन्प्रो इंडस्ट्रीज प्रा ली या दोन कंपन्यांनी हे दोन्ही कक्ष बांधून दिले आहेत.

उद्घाटन समारंभासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे विश्वस्त योगी निरंजननाथ, आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. केंद्रे, दिंडी मालक श्री आरफरकल, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त तुकाराम महाराज मुळीक, संतोष महाराज सुंबे, आळंदी शहरातील दक्षता कमिटीचे डी. डी. भोसले पाटील, प्रकाश कुराडे, संजय घुंडरे पाटील, एन्प्रो कंपनीचे व्यवस्थापक श्री किरपे, आयजीडब्ल्यू कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विकास दुधेजा आदी उपस्थित होते.

आळंदी पोलीस ठाण्याची स्थापना सन 2008 मध्ये झाली आहे. त्यापूर्वी आळंदी शहराचा परिसर चाकण पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत होता. त्यावेळी आळंदी येथे पोलीस चौकी होती. वाढती लोकसंख्या आणि इतर आवश्यकतेनुसार आळंदी पोलीस ठाण्यास मंजुरी मिळाली. हे पोलीस ठाणे पोलीस चौकीच्या जागेत सुरु झाले. चौकीची जागा पोलीस ठाण्यासाठी अपुरी पडत आहे.

पोलीस ठाण्यासाठी स्वतंत्र इमारत नसल्याने अधिकाऱ्यांना बसण्यासाठी तसेच अभ्यागत व ठाणे अंमलदार यांना बसण्यासाठी जागा अपुरी पडत होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कक्ष, ठाणे अंमलदार, सीसीटीएनएससाठी स्वतंत्र कक्ष उभारणे गरजेचे होते. आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयजीडब्ल्यू टेक्नोलॉजी प्रा ली आणि एन्प्रो इंडस्ट्रीज प्रा ली या दोन कंपन्यांनी त्यांच्या कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) फंडातून निधी उपलब्ध करून दिला. त्यातून आळंदी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक कक्ष आणि ठाणे अंमलदार कक्ष तयार करण्यात आला आहे.