आळंदीत बाह्यवळण मार्गाचा अभाव ; अवजडने वाहतुकीची कोंडी
आळंदीस वाहतूक नियंत्रण विकास आराखड्याची मागणी
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : तीर्थक्षेत्र आळंदीतील वाढती रहदारी, पर्यायी बाह्य मार्ग रस्ते विकासाचा अभाव यामुळे शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यासाठी मुख्य नगरप्रदक्षिणा मार्गावर एकेरी वाहतुकीसह तीर्थक्षेत्र आळंदी साठी विशेष वाहतूक नियंत्रण विकास आराखडा तयार करण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र वेळोवेळी वाहतूक विभागासह पोलीस प्रशासनास दिलेल्या अर्जावर प्रशंसनाचे दुर्लक्ष होत असल्याने दुहेरी वाहतूकीने कोंडीत भर पडून भाविक, नागरिक हैराण झाले आहेत. यात भाविकांच्या वाहनांवर होणारी दंड वसुली ही तेजीत होत असल्याने तीर्थक्षेत्र आळंदीत येणाऱ्या भाविकांसह नागरिकांतून वसुलीवर नाराजी व्यक्त होत आहे.
आळंदीत नगर प्रदक्षिणा मार्गावर दिवसा होणा-या अवजड वाहतुकीने मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्य नैमित्तिक झाल्याने नागरिक – भाविकांतून नाराजी व्यक्त होत आहे. येथील या पूर्वीच्या जाहीर एकेरी मार्गावर दुहेरी वाहतूक होत असल्याने यात आणखीन भर पडत आहे. येथील लग्नाची संख्या वाढल्याने गैरसोयीत वाढ होत असून यात बेशिस्त वाहन चालकां कडून वाहतूक कोंडीत भर पडत आहे. यात अनेक ठिकाणी वाहने वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नसल्याने आळंदीत दंड वसुली सुरु असून देखील वाहतुकीचे सुरक्षित आणि सुरळीत नियोजन होताना दिसत नाही. यातून येथील प्रभावी वाहतुकीचे नियोजनास वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी कानमंत्र-सूचना देऊन देखील कामकाज होत नसल्याने जणू काही येथील वाहतुकीची कोंडीचे नियोजनास विलंबाचे ग्रहण लागल्याचे बोलले जात आहे.
लग्नासाठी अल्प खर्चात व्यवस्थित सोय मुळे वाहतूक कोंडीत भर
आळंदी हे धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने येथे देवदर्शनासह लग्नासाठी अल्प खर्चात व्यवस्थित सोय होत असल्याने लग्न समारंभ देखील वाढत आहेत. लग्नास वाढती आळंदीची पसंती, वाढती महागाई, वाढता लग्न समारंभाचा खर्च यावर येथे मार्ग निघतो. अल्प खर्चात मिळणा-या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा यामुळे वाढणारी लग्नाची वर्दळ आणि या ठिकाणी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी नसलेले प्रभावी नियोजन येथील समस्यात वाढ करीत आहे. वाढत्या वाहतूक कोंडीचा दुचाकी चालकांना तसेच पादचारी प्रवासी नागरिक, वारकरी यांना त्रास सहन करावा लागत आहे. यात परिसरातील औद्योगिक वापराची वाहनांची दिवसा अवजड वाहनांना प्रवेश बंद असून देखील येत असलेली वाहने, रस्त्यावर दुतर्फा उभी राहणारी दुचाकी, चारचाकी वाहने यातून मार्ग काढताना चालकांना जीव मुठीत धरून,नगरप्रदक्षिणा मार्गावर धुळीत प्रवास करावा लागतो. यामध्ये लहान – मोठे अपघात होत आहे. यापूर्वी अपघातात अनेकांचे बळी गेले असून देखील येथील प्रभावी वाहतुकीचे आरोग्याचे दृष्टीने सुरक्षित आणि सुरळीत नियोजनासाठी सूचना मिळाल्या असताना देखील नियोजन होत नसल्याने नागरिक, भाविकांना नाहक गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे.
बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतुकीचे कोंडीत भर
यात बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतुकीचे नियम न पाळल्याने कोंडीत भर पडते.वरिष्ठ कार्यालयाने केलेल्या सूचनांप्रमाणे बेशिस्त वाहन चालकांवर नजर ठेवत आळंदी पोलीस कारवाईचा बडगा दंडात्मक पावती करून उगारतात मात्र पुन्हा दुसरी वाहने येऊन सुरळीत नियोजनात बिघाड आणतात. पुढे जाण्याचे प्रयत्नात आळंदीचे नगरप्रदक्षिणा मार्गावर तसेच मरकळ रस्ता, वडगाव रस्ता, पदमावती रस्ता, चाकण चौक, पुणे आळंदी रस्ता, चऱ्होली खुर्द रस्ता, नगरपरिषद चौक, घुंडरे आळी रस्ता, चाळीस फुटी रस्ता आदी परिसरात रस्त्यांचे दुतर्फ़ा वाहने पार्किंग ने वाहतुकीचे कोंडीत भर पडते. अलंकापुरीतील वाहतूक कोंडीची समस्या अनेक दिवसांपासून कायम आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी मुळे वाहन चालकांना मार्ग खुला होई पर्यंत थांबावे लागत आहे. विवाह सभारंभाचे मुहूर्त प्रसंगी आळंदीत सर्वत्र गजबज असते. विवाह कार्यालये, धर्मशाळा, मंदिरे, मठ आदी ठिकाणी विवाह सभारंभ होत असतात. बाहेरील गावा वरून व-हाडी लोकांची अनेक वाहने येत असतात. पुरेशा प्रमाणात वाहन तळ आणि खुली जागा उपलब्द्ध नसल्याने तसेच पर्यायी व्यवस्था होत नसल्याने अनेक वाहन चालक रस्त्यावर वाहने सोडून लग्न समारंभ उरकण्यास जातात. यामुळे इतर वाहनांना देखील आळंदी तील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. अनेक वेळा वाहतुकीच्या कोंडीने लग्नाला देखील पोहचण्यास उशीर होत असल्याने व-हाडी नाराजी व्यक्त करतात. यात बेशिस्त वाहन चालक गाडी पुढे नेण्याचे प्रयत्नात वाद घालतात. यातून देखील वाहतुकीचे कोंडीला अनेकांना सामोरे जावे लागत आहे. यात वाहतूक पोलीस सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत रस्त्यावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्नात असतात. मात्र धुळीचा आणि वाढत्या वाहतूक समस्येचा त्रास यामुळे वाहतूक सुरळीत करताना पोलीस प्रशासनावर देखील कामाचा प्रचंड ताण येत आहे. वाहतूक पोलीस संख्या आणि वाहतूक मार्गदर्शक वॉर्डन सेवा देण्यास कर्मचारी नियुक्ती करण्याची मागणी असून यासाठी सामाजिक संस्था आणि आळंदी नगरपरिषद यांनी सहकार्य करण्याची गरज व्यक्त होत आहे. वाहतूक साक्षरता करण्यासाठी आळंदी नगरपरिषदेने मदत देण्याची मागणी असून पर्यायी रस्ते खुले करून दिल्यास रहदारीस पर्याय मिळणार असल्याने आळंदी नगरपरिषदेने रस्ते रखडलेले भूसंपादन करण्यास प्राधान्य देण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकसित पूल अर्धवट, अर्धवट रस्ते विकासाला गती दिली जात नसल्याने आळंदीत वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.
एकेरी मार्गावर दुहेरी वाहतूक
येथील एकेरी मार्गावर दुहेरी वाहतूक होत असल्याने नवा आणि जुना पुलावरून ये-जा करणे विलंबास कारण ठरत आहे.आळंदी पालिकेनं यापूर्वी ठराव केले मात्र त्यावर प्रभावी कामकाज होत नसल्याने नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीस सामोरे जावे लागत आहे.केवळ नगरसेवकांचे नावाचे फलक लावून स्थळ,मार्ग दर्शक फलक न लावता जनजागृती न करता वाहतुकीची कोंडी दूर करण्याने मार्ग कसा मोकळा होणार असा सवाल भाविक व्यक्त करीत आहेत.
माऊली मंदिर परिसरात देखील थेट दुचाकी चार चाकी वाहने
माऊली मंदिर परिसरात देखील थेट दुचाकी, चार चाकी वाहने जात असल्याने लाखो रुपये खर्च करून विकसित केलेल्या लोखंडी दरवाजांचा उपयोग होताना दिसत नाही. भाविकांना मंदिरा समोरून ये-जा करता देखील येत नाही. मात्र आळंदी पालिका व पोलीस प्रशासन याकडे डोळे झाक करीत आहे. केवळ वाहनतळाचे फलक लावले मात्र त्याकडे वाहने जाण्यासाठी स्वच्छता आणि नागरी सुविधा उपलब्द्ध करून देण्याकडे लक्ष दिले जात नसल्याने थेट माऊली मंदिरा पुढे रस्त्यावर वाहने लावली जात आहेत. माउली मंदिरातून पुढे बाहेर आल्यानंतर भराव रस्ता आणि दगडी पाय-यावरून भाविकांना ये-जा देखील करता येत नाही. रहदारीचे मार्गावर पुढे वाहने पार्क असल्याने सुमारे दोन-तीन फुटातून भाविकांना महाद्वारात मार्ग काढावा लागतो. केवळ व्हि.आय.पी मान्यवर भेटी प्रसंगी मंदिर परिसर मोकळा श्वास घेतो असे नागरिक सांगतात. आळंदीतील वाहतुकीचे कोंडीस तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विलंबाने होत असलेल्या विकास कामामुळे, खड्डय़ांमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. लग्नसराई मुळे आळंदीतील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊन शहरातील प्रमुख चौकांत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. वडगाव चौकात वडगावकडून शहरात प्रवेश करणार्या वाहनांना अडचण निर्माण होते. परिणामी शहरातून बाहेर पडणारी वाहतुकही विस्कळीत होते.
चाकण आद्योगिक वसाहती कडून आळंदीमार्गे पुणे-नगर मार्गाकडे जाणा-या अवजड वाहनामुळे वाहनांच्या रांगा अधिक लागतात. चाकण चौक, नगरपालिका चौक, पोलीस ठाणे परिसर, मरकळ चौक, वडगाव चौक आदी ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या अधिक प्रमाणात होऊ लागली आहे. शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाने आळंदी पालिके समवेत सुसंवाद साधून प्रभावी उपाय योजना करण्याची गरज नागरीक व्यक्त करीत आहेत. माऊली मंदिर परिसर वाहन मुक्त झोन साठी आळंदी पालिकेने यापूर्वी ठराव करून देखील थेट वाहने मंदिरा समोर येत असल्याने भाविकांना मंदिराकडे ये-जा करताना त्रासदायक ठरले आहे.
पोलिस प्रशासनावर ताण ; रस्ते विकासाकडे दुर्लक्ष ; रस्ते भूसंपादन प्रक्रियेत कोणाचा खोडा
आळंदीत मुख्य नगरप्रदक्षिणा रस्त्या वरील नित्याचे वाहतुकीचे कोंडीने भाविक, नागरिक आणि वाहन चालक देखील त्रस्त झाले आहेत. आळंदीतील रस्ते विकासा पासून वंचित राहिल्याने येथील कोंडीचा प्रश्न कायम राहिला आहे. यातून येथील पोलिस प्रशासनावर देखील वाहतुकीचे उपाय योजना करताना कामाचा ताण येत आहे. आळंदी नगरपरिषदेने देखील रस्ते विकास अनुदान, विशेष रस्ते विकास अनुदानातील शासन निर्णय प्रमाणे १० टक्के निधी येथील वाहतूक साक्षरता मोहीमी साठी जनजागृती करण्यासाठी देण्याची गरज आहे. यात रस्ते दुतर्फा नाम फलक, स्थळ दर्शक फलक, वाहनतळ पार्किंग, वाहन मुक्त झोन, पी १, पी २ असे सम-विषम तारखांना पार्किंग धोरण प्रभावी पणे राबविण्याची गरज आहे. केवळ परिषदेने ठराव करून न थांबता त्यावर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत वाहतूक नियंत्रण शाखा, नागरिक यांचे कडून सूचना हरकती मागवून अंतिम मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरु करण्याची गरज व्यक्त होत आहे. यातून येथील पोलीस प्रशासनास देखील सुरळीत कामकाज करून आळंदी वाहतूक कोंडी मुक्त तीर्थक्षेत्र होण्यास हातभार लागेल. यासाठी यापूर्वी आळंदी जनहित फाउंडेशन, नेचर फाउंडेशनसह इतर मान्यवर पदाधिकारी यांनी निवेदने देऊन देखील त्यावर कामकाज होताना दिसत नाही. वाहतुकीच्या कोंडीने नागरिक, महिला, वृध्द,शालेय मुले याना नेहमी गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे. यात वेळोवेळी सुरळीत वाहतुकीचे नियोजन करून देखील बेशिस्त वाहन चालकांमुळे काही ठिकाणी नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे जाणकार सांगतात.
मरकळ रस्त्यावरून वडगाव कडे वाहने सतत उलट दिशेने येत असल्याने यात भर पडत आहे. एकेरी वाहतुकीचे नियोजन प्रभावी करण्याची उपाय योजना होत नसल्याने वाहन चालक नजर चुकवून वाहने घुसवीत येतात. पुढे वाहतुकीची कोंडी कायम राहते. हजेरी मारुती मंदिर चौकात देखील यात वाढ होत आहे. अनेकांना साधे पायी देखील जाता येत नाही. वाढत्या वाहतूक कोंडीचा पादचारी नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. यात येथून ये-जा करताना आता धुळीचा ही त्रास होऊ लागला आहे. रस्त्यांचे दुतर्फा वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने दुचाकी चालकांसह नागरिक, भाविकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. यामध्ये लहान-मोठे अपघात होत आहे. विवाह सभारंभाचे मुहूर्त असल्याने आळंदी शहर नित्याने गजबजलेली असते. शहरातील विविध ठिकाणची विवाह कार्यालये, धर्मशाळा, मंदिरे आदी ठिकाणी विवाह सभारंभ पार पडत असल्याने बाहेरील गावावरून
व-हाडी लोकांची अनेक वाहने सातत्याने अलंकापुरीत येत असतात. मात्न अशा वाहनांना आळंदीतील वाहतूक कोंडीचा सामना करत इच्छित स्थळी पोहोचावे लागत आहे. लग्नसराईमुळे आळंदीतील वाहतूक कोंडी कायम होत आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुरळीत वाहतुकीचे नियोजन पुणे वाहतूक पोलिस प्रशासनाने जाहीर करण्याची गरज व्यक्त होत आहे. तत्पूर्वी येथील रस्ते विकास कामास गती देण्याची गरज भाविकातून व्यक्त होत आहे.
आळंदीत वाहतूक कोंडी नित्त्याचीच; वाहतूक नियोजनाचा अभाव कायम आहे. आळंदीत मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी समस्या आता नित्याचीच होऊ लागल्याने येथील वाहतुकीचे नियोजनाचा आराखडा तयार करण्याची गरज येथील आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीने यापूर्वी निवेदन देऊन करण्यात आली होती.














































