पिंपरी, दि . ६ ( पीसीबी ) – आळंदी तिर्थक्षेत्राच्या जवळ कत्तलखान्याचे आरक्षण ठेवणे हे अत्यंत चुकिचे आणि खोडसाळपणाचे आहे. महाराष्ट्रातील तमाम हिंदू बांधवांच्या भावनेशी खेळण्याचा हा प्रकार आहे. महापालिका प्रशासनाने भविष्यात याच ठिकाणी कत्तलखाना उभारला तर दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठीच मोशी येथील कत्तलखाना आरक्षण रद्द करण्यात यावे आणि अन्य ठिकाणी त्याची तरतूद करावी, अशी मागणी शहरातील कुरेशी समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या कुरेशी फाऊंडेशचे अध्यक्ष इरशाद जाकीर कुरेशी यांनी केली आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना त्याबाबतचे एक लेखी निवेदन कुरेश समाजाने दिले आहे. निवेदनात आपली भूमिका सविस्तरपणे मांडली आहे. मोशी येथील कत्तलखाना आरक्षण कसे चुकिचे आहे त्यावर प्रकाश टाकला आहे. आळंदी तीर्थक्षेत्राजवळचा कत्तलखाना नकोच असे कुरेशी फाऊंडेशनने म्हटले आहे.
यापूर्वी पिंपरी येथील स.क्र.२०२ मध्ये कत्तलखाना उभारण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली होती. काही लोकांनी विरोध केल्याने तत्कालिन महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांनी जनसुनवाई घेतली होती. डाल्को कंपनीची जागा निश्चित केली होती. एचए कंपनला १० कोटी रुपयेसुध्दा महापालिकेने अदा केले होत मात्र, पुढे ही प्रक्रीया थांबवण्यात आली, असे कुरेशी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणले.
पिंपरी येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या खालील कत्तलखाना हा महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ आणि हरित लवाद यांच्या आदेशनंतर ८ डिसेंबर २०१२ पासून कायमस्वरुपी बंद करण्यात आला. प्रत्यक्षात लवादाने सर्व सुविधांनी युक्त असा आधुनिक कत्तलखाना उभारण्याचे आदेश दिले होते त्याचेही उल्लंघन महापालिकेने केले आहे. तब्बल १३ वर्षांनंतरही महापालिका नवीन कत्तलखाना उभारू शकलेली नाही, अशी खंत पत्रकात व्यक्त केली आहे.










































