पुणे, दि. २१ –
पिंपरी-चिंचवड महापालिका सुधारित विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित केलेला मोशी व तीर्थक्षेत्र आळंदीच्या परिसरातील कत्तलखान्याचे आरक्षण रद्द करण्यात येईल. वारकरी, भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांच्या श्रद्धेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. सर्वप्रथम पीसीबी टुडे न्यूज पोर्टलने या विषयावर व्हिडीओद्वारे जनजागृती केली आणि मान्यवरांच्या माध्यमातून चर्चा घडवून पाठपुरावासुध्दा केला. आयोध्येच्या प्रभु श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद गिरी महाराज यांच्या आश्रमाच्या जवळ हा कत्तलखाना होणार असल्याने त्यांनी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. मोशी, चऱ्होली ग्रामस्थ तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी कडवा विरोध दर्शविला. अखेर खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यासंदर्भात घोषणा केली आणि पिंपरी चिंचवड शहराच्या सुधारीत विकास आराखड्यातील कत्तलखाना कदापि होणार नसल्याची ग्वाही दिली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी पायी पालखी सोहळा पुण्यात दाखल झाला आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालखीचे दर्शन घेतले आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. दोन दिवसांपूर्वी, पिंपरी-चिंचवडमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात मोशी येथील प्रस्तावित कत्तलखाना आरक्षण रद्द करण्याबाबत मोशी, चऱ्होली ग्रामस्थ आणि भूमिपुत्रांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. तसेच, भाजपा आमदार महेश लांडगे यांनीही महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आळंदी शहरा जवळ कत्तलखाण्याचे आरक्षण विकास आराखड्यामध्ये टाकण्यात आले आहे. त्यामुळे श्रीक्षेत्र आळंदी सारख्या देवस्थानाच्या परिसरामध्ये अशा पद्धतीने कत्तलखाण्याचे आरक्षण टाकण्यात आल्याने त्याबाबत सर्व स्तरातून नाराज व्यक्त झाली.
पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जो काही विकास आराखडा आहे. त्या विकास आराखड्यामध्ये मोशी-आळंदी येथे कत्तलखाण्याचे आरक्षण दाखवण्यात आले आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही. त्याबाबतच्या आरक्षण वगळण्याच्या आदेश मी दिले आहेत. वारकऱ्यांना आणि वारकरी नेत्यांना सांगू इच्छितो कोणत्याही परिस्थितीत कत्तलखाना होणार नाही.










































