आर.आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला…- अजित पवार यांचा गौप्यस्फोट

0
61

मुंबई, दि. 29 (पीसीबी) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आघाडी सरकारच्या काळात ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाला भाजपाने उचलून धरले होते. अजित पवार यांच्याविरोधात गाडीभरून पुरावे असल्याचा दावा तेव्हा भाजपाने केला. या आरोपामुळे व्यथित झालेल्या अजित पवार यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही दिला होता. आता या आरोपांवरून अजित पवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. हे आरोप फक्त मला बदनाम करण्यासाठी झाले होते. तसेच या आरोपानंतर माझी खुली चौकशी करण्याच्या आदेशावर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्वाक्षरी केली होती, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. तासगाव-कवठे महांकाळ येथे हा दावा केल्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक आता कोणत्या दिशेने जाईल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

अजित पवार म्हणाले, केवळ मला बदनाम करण्यासाठी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले गेले. पण महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि इतर खर्च ४२ हजार कोटी एवढा होता. मग ७० हजार कोटींचा घोटाळा कुठून होणार? पण आकडाच इतका मोठा होता की, त्यातून माझी बदनामी झाली. पुढे चौकशीसाठी एक फाईल तयार केली गेली होती. ती फाईल गृहखात्याकडं गेल्यानंतर आर. आर. पाटीलनं माझी खुली चौकशी करावी, म्हणून स्वाक्षरी केली. केसानं गळा कापयाचे धंदे झाले राव. नंतर आम्ही पृथ्वीराज चव्हाण यांचा पाठिंबा काढून घेतल्यामुळं सरकार गेलं. राष्ट्रपती राजवट लागली.

देवेंद्र फडणवीसांनी मला फाईल दाखवली
“राष्ट्रपती राजवट लागल्यामुळे तत्कालीन राज्यपालांनी फाईलवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. निवडून आलेलं सरकार यावर निर्णय घेईल, असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं सरकार निवडून आलं. फडणवीस यांनी फाईलवर स्वाक्षरी केली. त्यांनी मला घरी बोलावलं आणि फाईल दाखवली. ते म्हणाले, तुमच्या आबाने तुमची चौकशी करण्यासाठी या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. आता मला मुख्यमंत्री म्हणून सही करावी लागेल. मला त्यादिवशी खूप वाईट वाटलं”, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली. “जीवाभावाचा सहकारी पण माझं काहीतरी चुकलं असेल म्हणून मला कामाला लावून बाबा…”, असंही अजित पवार पुढं म्हणाले.

“मला एकदा गृहमंत्रालय द्या, असं मी अनेकदा माझ्या नेत्यांना सांगितलं होतं. मला वेडं-वाकडं खपतच नाही. एकेकाला सरळ केलं असतं. माझा कार्यकर्ता चुकला तरी त्याला टायरमध्ये टाका म्हणण्याची माझ्यात धमक आहे. आर.आर. गेल्यानंतर स्मिताच्या लग्नासाठी मी उभा राहिलो. माझ्या जिजाई बंगल्यात लग्न झालं. मी उपकार केले नाहीत. तर सहकाऱ्याच्या मुलीसाठी मी केलं होतं”, असंही अजित पवार म्हणाले.

तासगाव-कवठे महांकाळमधून महाविकास आघाडीने आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र अजित पवार यांनी सांगलीचे दोन टर्म खासदार राहिलेले भाजपाचे माजी नेते संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली आहे. एकेकाळी आर. आर. पाटील यांचे कडवे विरोधक असलेल्या संजयकाका पाटील यांच्यामुळे रोहित पाटील यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण झाले आहे.