आर्या विरोधात निर्णय घेतल्यास बिग बॉस एक स्क्रिप्टेड शो, निक्की-आरबाझच्या हिंसक वागणुकीकडेही दुर्लक्ष!

0
98

मुंबई, दि. १४ (पीसीबी) : बिग बॉस मराठीच्या घरातील वादळ थांबायचं नाव घेत नाहीये. नुकत्याच घडलेल्या आर्या जाधव आणि निक्की तांबोळीच्या वादावर बिग बॉसने आर्याला हिंसा हे कारण देऊन एविक्ट केलं तर ही मोठी चूक ठरेल, अशी चाहत्यांची भावना आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत बिग बॉसच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

आर्या विरोधात निर्णय घेतला जात असताना, चाहत्यांनी इतर स्पर्धकांच्या वागणुकीचीही चर्चा केली आहे. अरबाज पटेलवर टास्कदरम्यान वारंवार आक्रमक झाल्याचे आरोप आहेत. जन्हवीने देखील कबुली दिली होती की, अरबाजने तिच्यासोबत टास्कमध्ये जवळजवळ कुस्तीच केली आणि तिचा हात पिरगळला होता. तसेच, टोपी टास्कमध्येही अरबाजने अभिजीतला सरळ धक्का दिल्याचं समोर आलं होतं, पण त्यावेळी बिग बॉसने कोणतीही कारवाई केली नाही.

निक्की तांबोळीवरही हिंसक वागणुकीचे आरोप आहेत. दोन वेळा निक्कीची नखं आर्याच्या हातावर आणि गालावर लागली होती, परंतु बिग बॉसने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. आर्या आणि निक्कीच्या वादानंतर निक्कीने आर्याला लाथ मारल्याचं देखील समोर आलं, पण त्यावेळीही बिग बॉसने दुर्लक्ष केलं.

चाहत्यांनी बिग बॉसवर पक्षपातीपणाचा आरोप करत म्हटलं आहे की, निक्की ही बिग बॉसची “महाराणी” असल्याने तिच्या चुकांकडे दुर्लक्ष होत आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडिया पेजवर निक्की आणि अरबाज विरोधात ९५% कॉमेंट्स असूनही, चॅनेल त्यांना पाठीशी घालत आहे.

आर्याला हिंसा हे कारण देऊन एविक्ट केल्यास हा एक अत्यंत चुकीचा निर्णय असेल, असा इशारा आर्याच्या चाहत्यांनी दिला आहे. आर्याच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट्स आणि कॉमेंट्सचा पूर आला असून, बिग बॉसला याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

चाहत्यांनी स्पष्ट केलं आहे की, जर पक्षपातीपणा असाच सुरू राहिला तर बिग बॉसची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते आणि TRP च्या नादात असा निर्णय घेणं शोच्या प्रतिमेसाठी घातक ठरेल.