आर्मी ऑफिसर असल्याचे सांगत व्यावसायिकाला सव्वा पाच लाखांचा गंडा

0
331

पिंपळे निलख , दि. २५ (पीसीबी) – आर्मी ऑफिसर असल्याचे सांगत व्यावसायिकाकडून पाच ड्रम ट्रॉली ऑर्डर केल्या. आर्मीच्या नियमाप्रमाणे अगोदर व्यवसायिकाकडून पैसे घ्यावे लागतील असे सांगत त्याने वेळोवेळी पाच लाख 22 हजार रुपये घेत व्यावसायिकाची फसवणूक केली. हा प्रकार 13 ते 18 जुलै या कालावधीत पिंपळे निलख येथे घडला.

अजित लालासाहेब शिंदे (वय 46, रा. पिंपळे निलख) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप रावत, कुलदीप सिंग, कुणाल चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आर्मी ऑफिसर असल्याचे सांगून फिर्यादी यांच्या दुकानातून 57 हजार 840 रुपये किमतीच्या पाच ड्रम ट्रॉली ऑर्डर केल्या. त्यानंतर आर्मीच्या नियमाचे कारण सांगून फिर्यादी यांच्याकडून गुगल पे द्वारे 20 हजार रुपयांचे पाच ट्रांजेक्शन, तसेच 17 हजार 820 रुपयांचे दोन ट्रांजेक्शन केले. त्यानंतर आय एम पी एस द्वारे दोन बँक खात्यांवर एक लाख 93 हजार 460 रुपये असे एकूण पाच लाख 22 हजार 560 रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी यांना त्यांचे पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली. आरोपींनी अशाप्रकारे फसवणूक करण्यासाठी आर्मीच्या नावाने बनावट खाते बनवले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.