आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांनी संपादन केले उज्ज्वल यश

0
129

पिंपरी – शेतमजूर, असंघटित कामगार, मोलमजुरी करणार्‍या परिवारातील होतकरू विद्यार्थ्यांची शाळा असा लौकिक असलेल्या मुळशी तालुक्यातील माण येथील जय शिवराय प्रतिष्ठान संचलित न्यू इंग्लिश स्कूल, माण या विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ चा इयत्ता दहावीचा निकाल ९७.२२ टक्के लागला. इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी यावर्षी एकूण १०८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सुमारे १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये ९ विशेष श्रेणी, ५० प्रथम श्रेणी, ४३ द्वितीय श्रेणी, ३ उत्तीर्ण श्रेणी संपादन करून यशस्वी झालेत; तर ३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत. अनुक्रमे यश मगर ८७.२०%, नेहा बिरारे ८६.८०%, रूपाली गोसावी ८२.८०%, प्राची खंडागळे ८१.००% आणि ओजस्विनी भोसले ७७.८०% या पाच विद्यार्थ्यांनी गुणवंतांच्या क्रमवारीत स्थान पटकावले.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी शाळा व्यवस्थापन व विकास समिती, शाळा समिती, पालक शिक्षक संघ, माण ग्रामस्थ, ग्रामपंचायत माण, दिलासा साहित्य संस्था, परिसरातील सामाजिक संस्था, विविध कंपन्या, समाजातील दानशूर आणि पालक, शिक्षक, हितचिंतक यांचे मौलिक सहकार्य लाभले आहे, असे मुख्याध्यापक अंबादास रोडे यांनी नमूद केले.