मुंबई दि.02 (पीसीबी)
संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी मोठा दावा केला आहे. अजित पवार मस्साजोगला संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात आरोपी वाल्मिक कराडची गाडी सुद्धा होती असा धक्कादायक आरोप बजरंग सोनावणे यांनी केला. 12 तारखेला वाल्मीक कराड आणि पोलीस यंत्रणा यांची नेत्याच्या कार्यालयात भेट झाली. पंधरा तारखेला शपथविधी सोहळ्याला आरोपी वाल्मिक कराड नागपूरमध्ये हजर होता असा आरोप खासदार बजरंग सोनावणे यांनी केला आहे. परळीतून पुणे मग गोवा आणि पुन्हा पुणे असा वाल्मिक कराडचा प्रवास सुरु असताना पोलीस काय करत होते? असा सवाल बजरंग सोनावणे यांनी विचारला आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मोठा दावा केला आहे.
“ज्या दिवशी ते शनिवारी 16 तारेखला आले, त्यांच्या ताफ्यामध्ये गाडी होती. त्या गाडीत हा आरोपी होता, तो तिथे जाऊन सरेंडर होतो. याचा अर्थ काय? ताफ्यामधील आरोपी तिथे जाऊन सरेंडर होतो. मस्साजोगला ही गाडी होती. त्याच गाडीमधील आरोपी जाऊन शरणगती देतोय. गाडी कोणाच्या नावावर आहे?” असा सवाल बजरंग सोनावणे यांनी केला.
…तर हे घडलं नसतं
“मागच्या मे महिन्यात जो गुन्हा दाखल होता, तेव्हा जर कारवाई झाली असती तर हे सगळं घडलं नसतं. पोलिसांनी वेळीच गुन्हा दाखल केला असता तर हे झालं नसतं” असा दावा बजरंग सोनावणे यांनी केला. “आमच्या खंडणी गोळा करण्याच्या कामात जर अडथळा निर्माण केला, तर काय होतं हे दाखवण्यासाठी असं मारलं. ज्या दिवशी हत्या झाली तेव्हा हा आरोपी परळीत होता. हत्या झाल्यानंतर आरोपी आणि पोलिसांची भेट झाली” असा दावा बजरंग सोनावणे यांनी केला.
फार्म हाऊसवर भेट
“त्यानंतर हा आरोपी एका नेत्याच्या फार्म हाऊसवर भेटला. त्यानंतर आरोपी शपथविधीला पोहोचतो. तेव्हा अटक का झाली नाही?” असा सवाल बजरंग सोनावणे यांनी केला. “अजित पवार जेव्हा मस्साजोगला आले, तेव्हा त्यांच्या ताफ्यात जी गाडी होती, त्याच गाडीतून हा आरोपी पोलिस स्टेशनला पोहोचला. पुण्यात आरोपी ज्या घरात थांबला त्याचा तपास व्हायला पाहिजे” अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली आहे.