आरोग्य विभागाऐवजी आता जलपर्णीची जबाबदारी पर्यावरण विभागाकडे

0
399

पिंपरी,दि. ३१ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातून वाहणा-या पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीतील जलपर्णी काढण्याची जबाबदारी आता आरोग्य विभागाऐवजी पर्यावरण विभागाकडे असणार आहे. याबाबतचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी काढला आहे.

महानपालिका कार्यक्षेत्रातील नदीपात्रामध्ये जलपर्णीची वाढ ही त्या अर्थाने प्रदूषणाची निदर्शक आहे. जलपर्णी वाढलेली दिसली की जिवाणूंचा धोका वाढतो. जलपर्णी काढण्याचे कामकाज महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येते. जलपर्णी असेल तर नदीचा प्रवाह खुंटतो. हवेतील ऑक्सिजन पाण्यात मिसळण्याची क्रिया मंदावते. डासांचा प्रादुर्भाव वाढतो व लोकांना प्रदूषण झाल्याचे लक्षात येते. शहराच्या सांडपाण्यातून वा रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेत जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यातील वा कारखान्याच्या सांडपाण्यातील पोषक द्रव्ये पाण्यात मिसळली की जलपर्णी वाढते. ही पोषक द्रव्ये पाण्यात मिसळणे जोपर्यंत बंद होत नाही. तोपर्यंत जलपर्णीची वाढ अनिर्बंधपणे होत राहते. यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने जलपर्णीचा प्रश्न हाताळण्यात आवश्यक आहे.

याबाबी विचारात घेवून जलपर्णी काढण्याचे कामकाज आरोग्य विभागाकडे सोपविलेले आहे. हे काम यावर्षीचा पावसाळा सुरु होईपर्यंत म्हणजेच जून 2023 अखेर राहील. तथापि, त्यानंतर हे कामकाज पर्यावरण विभागाकडे सोपविण्यात आले आहे.  पर्यावरण विभागाने सन 2023-24 मध्ये यासंदर्भात करावयाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने अंदाजपत्रकात तरतूद करणे व निविदेबाबतची कार्यवाही तात्काळ करावी, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले आहे.