आरक्षण सोडतीकडे इच्छुकांनी फिरविली पाठ

0
345

पिंपरी दि. २९ (पीसीबी) – महापालिकेच्या निवडणुकीसाठी ओबीसी आणि सर्वसाधारण महिलांच्या आरक्षण सोडतीबाबत इच्छुक, नागरिकांमध्ये निरुत्साह दिसून आला. आरक्षण सोडतीकडे इच्छुक, नागरिकांनी येणे टाळले. राजकीय पक्षांचे काही पदाधिकारी, मोजके कार्यकर्ते हजर होते. नाट्यगृह पूर्णपणे रिकामे होते.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण दिल्याने यापूर्वी 31 मे 2022 रोजी काढलेले एससी आणि एसटीचे आरक्षण कायम ठेवून निवडणूक आयोगाने सर्वसाधारण आरक्षण रद्द केले होते. ओबीसीसह नव्याने सोडत काढण्याचे आदेश दिले होते. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिका निवडणूक शाखेने आज (शुक्रवारी) नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि सर्वसाधारण महिलांच्या जागांसाठी आरक्षण सोडत काढली. या सोडतीला इच्छुकांसह नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्‍यता गृहित धरून पालिकेच्या वतीने तयारी केली होती. नाट्यगृहाच्या बाहेर नागरिकांना सोडत बघण्यासाठी स्क्रीनची लावली होती. खुर्च्यांची व्यवस्था केली होती. मात्र, या सोडतीकडे इच्छुकांनी, नागरिकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले.

निवडणुक विभागाने आतापर्यंत प्रभाग रचना, एससी, एसटी आरक्षण सोडत, अंतिम मतदार याद्यांचे काम पूर्ण केले आहे. आता शेवटचा महत्वपूर्ण टप्पा असलेले ओबीसी आणि सर्वसाधारण महिला आरक्षणांची सोडतही काढली. असे असले तरी राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या भाजपकडून पुन्हा तीन ऐवजी चारचा प्रभाग होणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने सर्व प्रक्रिया होते की काय ? महापालिका निवडणूक लांबणीवर जाईल का? याबाबत सध्या तरी कोणीच ठामपणे काहीही सांगू शकत नाही. त्यामुळेच की काय आरक्षण सोडतीकडे इच्छुकांनी पाठ तर फिरविली नाही ना? अशी चर्चा रंगली आहे.