आरक्षण आंदोलक आक्रमक, नांदेडला एसटी बस पेटवली

0
229

नांदेड, दि. १३ (पीसीबी) – मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण तापलं आहे. आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यातच नांदेड जिल्ह्यात एक बस जाळण्याचा प्रकार घडला आहे. वसमत रोडवर २० ते २५ अज्ञात तरुणांनी बसवर दडगफेक केली आणि त्यानंतर बस पेटवून दिल्याची माहिती आहे.

माहितीनुसार, बसमध्ये एकूण ४७ प्रवाशी होते, बस रात्रीच्या वेळेस नांदेडकडे जात होती. कासारखेडा पुलाजवळ बस आल्यानंतर २० ते २५ अज्ञातांनी बसवर दगडफेक केली, यावेळी प्रवासी बसमध्ये बसले होते. त्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घाबरलेल्या अवस्थेत प्रवाशी बसमधून खाली उतरले.

प्रवाशी खाली उतरल्यानंतर जमावाने पेट्रोल टाकून बस पेटवून दिली. यावेळी अज्ञातांनी ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्याचं सांगितलं जातं. पोलिस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेमुळे परिसरात तणाव आहे.

बसच्या कंडक्टरने दिलेल्या माहितीनुसार २०-२५ लोकांच्या जमावाने बसवर हल्ला केला. प्रवाशी बसमध्ये असताना बसवर दगडफेक झाली. कंडक्टरने सांगितलं की, ‘बसमध्ये लहान-लहान लेकरं होते. महिला-वयस्कर व्यक्ती होते. जमावाने माझी बॅग देखील घेऊ दिली नाही. त्यांनी मला देखील जाळण्याचा प्रयत्न केला.ड्रायव्हरच्या मागे दगड घेऊन लागले. मी बसमधून बाहेर निघालो नव्हतो, तोपर्यंत त्यांनी काडी लावून बस पेटवून दिली.मी जळत्या गाडीतून बाहेर पडलो.