आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजात दोन गट

0
36

मुंबई, दि. ७ ऑगस्ट (पीसीबी) – गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने पेट घेतला आहे. अनेक ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात आंदोलने सुरू आहेत. अशातच आता मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटलांनी आरक्षणासाठी वेगळे आंदोलन उभे केले आहे. केरे पाटलांचे आंदोलन आमचे आंदोलन नाही, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे एका आरक्षणासाठी दोन वेगवेळी आंदोलने आता मराठा समाजातून होताना दिसत आहेत. त्यामुळे आरक्षणावरून मराठ्यांमध्ये दोन गट पडले आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील यांनी मुंबईत ‘जवाब दो आंदोलन’ करण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्याबाहेर केरे पाटलांनी आंदोलनाची तयारी केली होती. मात्र त्यांची गाडी गिरगाव चौपाटीजवळ अडवण्यात आली. रमेश केरे पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. फडणवीसांनी मराठा आरक्षणासंदर्भात भाजपची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केरे पाटील यांनी केली आहे. सगळे राजकीय पक्ष फक्त मराठा समाजाला झुलवायचे काम करतात. पण ठोस भूमिका कुणीही घेत नाही, अशी प्रतिक्रिया केरे पाटलांनी दिली आहे. केरे पाटलांनी मुंबईत केलेल्या आंदोलनावर मनोज जरांगे पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आमचे राज्यात कुठेही आंदोलन सुरू नाही असे सांगत केरे पाटलांच्या आंदोलनापासून हात झटकले आहेत. त्यामुळे मराठा समाजामध्ये फूट पडली आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. अशा जरांगे आणि केरे पाटलांची आंदोलने ही मात्र वेगवेगळी होत आहेत. अशात केरे पाटलांचे आंदोलन कोणाच्या सांगण्यावरून झाले आहे असे जरांगे म्हणत आहे. शिवाय फडणवीसांनी मराठेच मराठ्यांच्या अंगावर सोडले आहेत, असा मोठा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केरे पाटील आणि आंदोलकांना फडणवीसांनी सागर बंगल्यावर चर्चेसाठी बोलावले होते. ते भेट घेऊन आल्यानंतर जरांगेंच्या वक्तव्यावर केरे पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी जी मागणी करत आहे ती अखंड मराठा समाजासाठी करत आहे. जरांगे पाटील जे सांगत आहे की ओबीसीमधून आरक्षण हवे अशीच मागणी आम्ही करत आहोत. जरांगे पाटील यांच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही सहभागी असू. जरांगे यांच्याप्रमाणे आम्ही पण आरक्षणासाठी मागणी करत आहोत, असे रमेश केरे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

जरांगे पाटील समाजाची दिशाभूल करू नका – दरेकर
मनोज जरांगे यांनी भोळ्या भाबड्या मराठा समाजाचे समर्थन मिळवले. पण आता त्यांच्या पोटात जी राजकीय महत्त्वकांक्षा होती, ती आता समोर आली आहे. यापूर्वी राज्यभरात मूक मोर्चा झाले त्याला कुठलाही नेता त्यावेळी नव्हता. मराठा समाजाने एक विश्वास टाकला होता त्याला ठेच पोहोचवू नका. केवळ विधानसभेपुरता प्रश्न धगधगत ठेवायचा हा त्यांचा हेतू आहे. जरांगे जवळपास राजकीय झालेले आहेत. मराठा समाजाचे कवच घेऊन ते राजकीय भूमिका निभावत आहेत. बांगलादेश येथे काय मुद्दा आहे ते आधी समजून घ्या, माहिती न घेता त्याच्याशी संदर्भ जोडून वातावरण पेटवू नका, असे म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. मराठा समाजासाठी अनेक संघटना काम करत असतात. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण दिले होते ते टिकले होते, असे सांगत दरेकरांनी मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे.