दि. २ (पीसीबी)- मनोज जरांगे यांच्या मागण्यावर उपसमितीने चर्चा केली असून त्यावर अंतिम मसुदा तयार केला आहे. तो मसुदा आता लवकरच मनोज जरांगे यांना देण्यात येणार असल्याची माहिती मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. या संबंधित चर्चा करुन मार्ग काढणार असून मनोज जरांगे त्याला प्रतिसाद देतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आंदोलन करत असून त्यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे.मनोज जरांगे यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक असून त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी उपसमिती जाणार आहे अशी माहिती विखे पाटील यांनी दिली. राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे, जयकुमार गोरे यांच्यासह काही महत्त्वाचे नेते या समितीत असतील अशी माहिती विखेंनी दिली.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या संबंधी निर्णय हा उपसमितीला घ्यायचा आहे. न्यायमूर्ती शिंदे समितीने जरांगे यांची भेट घेतली. त्यावेळी न्यायमूर्ती शिंदे आणि जरांगे यांच्यामध्ये झालेल्या चर्चेवर पुन्हा आमच्यामध्ये चर्चा झाली. कायद्याच्या चौकटीत गोष्टी कशा बसतात यावर चर्चा केली. त्यानंतर आता अंतिम मसुदा तयार करण्यात आला असून तो जरांगे यांना देण्यात येणार आहे.
आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखतो, त्यांच्या निर्देशानुसार सर्व रस्ते रिकामे केले. पण मनोज जरांगे आझाद मैदान सोडणार नाहीत असं मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी स्पष्ट केलं.या आधी सुनावणी घेताना मुंबई उच्च न्यायालयाने दुपारी 3 वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामं करण्याचे आदेश सरकारला दिले होते. लोकांमध्ये भीतीचं वातावरण असून ते घराबाहेर पडू शकत नाहीत असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं होतं. त्यामुळे प्रशासनाने मैदान रिकामं करावं, अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर उतरुन आढावा घेऊ अशा इशाराही दिला होता.