आयुक्त साहेब, माणसं मरायची वाट पाहता काय ?

0
566
  • थर्ड आय – अविनाश चिलेकर

पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासन आणि पोलिस यंत्रणा माणसांचे मुडदे पडायची वाट पाहते की काय अशी शंका येते. लोकप्रतिनिधी नसल्याने अडिच वर्षांत प्रशासन अक्षरशः गेंड्याच्या कातडीचे झालेय. जाब विचारायला कोणी बाप माणूस नसल्याने मनाचे राज्य आहे. शेकडो कोटींचा मलिदा खाऊन हे बाबू सुस्तावलेत, मस्तवाल बनलेत. काल डोंबिवलीत आग लागून सहा-सात निष्पाप जीव होरपळून मेले. आगीत गोरगरिबांचे संसार उघड्यावर आले. पिंपरी चिंचवड शहरात आजवर अशा घटनांची गणतीच नाही. सात वर्षांपूर्वी भोसरीत साई केमिकल्स उद्योगात आग लागून नऊ महिलांचा जळून कोळसा झाल्याची घटना आजही अंगावर शहारे आणते. वाटले होते त्यानंतर प्रशासन शहाणे होईल पण कशाचे काय. गेल्या दोन-तीन वर्षांतील घटनांचा मोगावा घेतला तरी हे बथ्थड प्रशासन किती धुंदीत आहे ते लक्षात येईल. पूर्णानगर येथे एका हार्डवेअरच्या दुकानातील पोटमाळ्यावर आग लागली आणि आख्खे पाच जणांचे कुटुंब जळून खाक झाले. रुपीनगर तळवडे भागातील मेनबत्ती की फटाका कारखान्यात आग लागली आणि तिथेही दहा महिला कामगारांची राखरांगोळी झाली. वाल्हेकरवाडीत एका कोळश्याच्या वखारीत पोटमाळ्यावर झोपलेले दोघे भाऊ आगीत कोळसा होऊन संपले. एका पाठोपाठ अशा घटना घडल्या पण पालिकेचा अग्निशामक विभाग झोपेचे सोंग घोऊन होता. शहरातील शेकडो लहान-मोठे कारखाने, दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, रुफटॉप हॉटेल-बार, पार्कींगच्या जागेतील हॉटेल-बार, खानावळी आणि युवा पिढी बरबाद करणाऱ्या पब कडे या बोक्यांनी हप्ते खाऊन दुर्लक्ष केले. लोक मरत होते आणि हे लांडगे हप्ते गोळा करत होते.

शहरात आज तब्बल ४३ रुफटॉप हॉटेल झालीत आणि त्यांना कुठलीच परवानगी नाही. हे सगळे रातोरात झालेले नाही. पाच-सात लाखांची लाच देऊन रुफटॉप हॉटेल, पब राजरोस चालतात. महामार्गाच्या दुतर्फा आज पब दिसतात. पुणे शहरातील कोरेगाव पार्कला हिट एन्ड रन मुळे दोन तरुण आयटी अभियंते बिल्डरच्या कार्ट्याकडून बळी गेले. त्यानंतर जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त जागे झाले आणि पब सिल करू लागले. वाकड, रावेत, ताथवडे, हिंजवडी, बावधन, बालेवाडी, बाणेर भागात मध्यरात्री पर्यंत पब चालतात. रुफटॉप हॉटेलचे ९० टक्के मालक राजकारणी आहेत. मुंबईतील रुफटॉप हॉटेलला आग लागली होती त्यावेळी गुदमरून लोक मेले, कारण पळायला जागा नव्हती. आज पुणे-पिंपरी-चिंचवड शहरात असे शेकडो रुफटॉप हॉटेल आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, चिंचवड, निगडी, स्पाइन रोड, भोसरी या भागांसह महापालिका हद्दीलगत असलेल्या परिसरात मोठ्या संख्येने रुफटॉप हॉटेल्स तयार झाली आहेत. जोवर आग लागत नाही, माणसांचे मुडदे पडत नाहीत तोवर यंत्रणेला जाग येत नाही. प्रशासनावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने जनतेची अवस्था मेल्याहून मेल्यासारखी झालीय. शहरात बहुसंख्य कमर्शियल कॉम्पलेक्समधील तळमजल्याचे वाहनतळात मोठ मोठी हॉटेल्स झालीत. पार्कींगच्या जागा हॉटेल चालकांनी बळकावल्यात. अशाच केसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पिंपरीतील रत्ना हॉटेल प्रकरणात आदेश देऊनही मनपा प्रशासनाने डोळे मिटून सरळ दुर्लक्ष केले. सगळे नियम धाब्यावर बसून असली हॉटेल्स उभी राहतात आणि अपघात,स्फोट झाला की मग कारवाईचा फार्स होतो. सद्या पब आणि रुफटॉप हॉटेलबाबत निव्वळ फार्स सुरू आहे. पोलिसांना किती हप्ते मिळतात त्याचा हिशेब स्वतंत्र मांडावा लागेल. उत्पादन शुल्क विभाग निव्वळ हप्ते गोळा करतो, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. बार, वाईन शॉप्स, देशी दारू दुकानांनी सर्व नियम धाब्यावर बसवलेत, पण डोळे फुटलेल्या उत्पादन शुल्क विभागाला ते दिसत नाही. रात्री अगदी रस्त्यावरच्या चायनीजच्या टपऱ्यांवरसुध्दा दारू मिळते.

शहरात शेकडो आगीच्या घटनांतून प्रशासनाने फक्त एक संधी साधली. ४२ कोटींची अद्यावत साहित्य खरेदी करून मलई खाल्ली. मेलेल्याच्या टाळूवरच लोणी चाटून पुसून खाणारी ही प्रवृत्ती प्रथम ठेचली पाहिजे. दिवाळीला फटाक्यांचे दुकानासाठी परवाने देताना पिंपरीच्या कापड बाजारात फटाक्यांची दुकाने असतात. पोलिस आणि महापालिकेचा फायर विभाग मिळून लाखोंचा मलिदा घेऊन हे परवाने देतात. जोवर भ्रष्टाचारी प्रशासन आहे तोवर हे असेच होणार. सात-दहा कोटी रुपये थेट मंत्र्याला देऊन या शहरात पोस्टिंग घेणारे अधिकारी पैसे कमावण्यासाठी वाट्टेल त्या थराला गेलेत. हिट एन्ड रन चा प्रकार पुण्यात घडला, पण पिंपरी चिंचवड शहरातसुध्दा बापजाद्यांच्या जमिनीच्या पैशावर अशा अलिशान गाड्या उडवणाऱ्यांच बिलकूल कमी नाही. विना नंबर प्लेटच्या दुचाकीवर तीन-तीन जण जाणारे प्रत्येक चौकात सापडतील. सोन्याच्या मुलामा असलेल्या काळ्या काचांच्या कार चालकावर कारवाई केल्याच्या बाता मारणाऱ्या पोलिसांच्या बातम्या वाचल्या. तीच कार पुन्हा काळ्या काचा लावून पोलिसांच्या नाकावर टिच्चून शहरात फिरते. हजारो काळ्या काचांची दादा-भाऊंची वाहने शहरात फिरतात. कानठळ्या बसविणाऱ्या बुलेट पुणे शहरात जप्त होतात, इशे त्या रुबाबात धुम मचालो करत जातात. वाहतूक पोलिसांच्या समोर पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, काळेवाडीत तीन आसणी रिक्षात सहा-सात लोक अक्षरशः कोंबून प्रवास करतात. महिना २५ लाखांचा हप्ता मिळतो म्हणून वाहतूक शाखा डोळे झाकून घेते. जोवर माणसे मरत नाहीत तोवर हा खेळ असाच चालतो. प्रशासनातील गिधाडे मुडदे पडायचीच वाट पाहतात. हिट एन्ड रन ची वाट पाहू नका, कारवाई करा. जनतेच्या भावनांचा उद्रेक झाला तर अराजक माजेल आणि त्याला जबाबदार सर्वस्वी हे भ्रष्ट प्रशासन असेल.आयुक्त साहेब, माणसं मरायची वाट पाहता काय ?