आयुक्त साहेब, आणखी किती बळी घेणार ? – स्थायी समिती माजी अध्यक्षा सिमा सावळे यांचा सवाल

0
494

मेणबत्तीच्या कारखान्यातील अगितील नऊ बळी, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरात तळवडे येथील एका मेणबत्तीच्या बेकायदा कारखान्याला आग लागली आणि निष्पाप नऊ जणांचा होरपळून हकनाक बळी गेला. आगीत होरपळलेल्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. खरे तर, हे पाप महापालिकेच्या भ्रष्ट प्रशासनाचेच आहे. आणखी किती बळी घेणार आहात, असा रोखठोक सवाल स्थायी समिती माजी अध्यक्षा सिमा सावळे यांनी केला आहे.

यापूर्वी अशाच प्रकारे एका हार्डवेअर दुकानातील पोटमाळ्यावर राहणाऱ्या कुटुंबातील पाच जणांचा बळी गेला. या सर्व घटना अत्यंत दुर्दैवी असून टक्केवारीच्या धुंदीत असलेल्या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या लेखी निवेदनात त्या म्हणतात, सुरवातीला या घटनेत सात मृत्यू होते आता तो आकडा नऊ झाला आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत पण त्यांच्या तब्बेतीत सुधारणा नाही. दिवसेंदिवस या दुर्घटनेचे गांभीर्य वाढत चालले आहे मात्र, बधीर प्रशासनाला गम नाही.

महापालिकेच्या भ्रष्ट, निगरगट्ट, असंवेदनशील प्रशासनाच्या कामकाजाचेच हे निष्पाप बळी आहेत. प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त शेखर सिंह, अग्नी प्रतिंबधक विभाग प्रमुख, अवैध बांधकाम नियंत्रण विभाग प्रमुख म्हणून संबंधित प्रभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, बीट निरीक्षक यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी सिमा सावळे यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात आग लागल्याच्या घटना वारंवार घडल्या. यापूर्वी पूर्णानगर येथील हार्डवेअर दुकानाला मध्यरात्री आग लागून आख्खे पाच जणांचे कुटुंब जळून खाक झाले. त्यावेळी शहरातील सर्व इमारतीचे फायर ऑडिट करण्याची मागणी केली. प्रशासनाने तत्काळ दाखल घेतली आणि सर्वेक्षणही केले. हजारो इमारतींना आग प्रतिबंधक यंत्रणा नाही किंवा त्याचे प्रमाणपत्र नसल्याचे यावेळी निदर्शनास आले. लाचखोर प्रशासन पैसे घेऊन दुर्लक्ष करतात असेही लक्षात आले. भोसरी येथील केमिलकल कारखान्यात लागलेल्या आगीत नऊ निष्पाप महिला जाळून खाक झाल्याची घटना आठवली की, अंगावर शहारे येतात. अशा अनेक घटना घडूनही भ्रष्ट प्रशासन आजही बधलेले नाही. आधुनिक वाहने आणि यंत्रणा खरेदीसाठी सुमारे ४० कोटी खर्च केले पण कार्यक्षमतेत बिलकूल सुधारणा नाही.

त्यामुळेच या सर्व मृत्यूला सरळ सरळ महानगरपालिकेचा निष्काळजीपणा असल्याचे दिसून आले. या गोदामाला परवाना होता का? त्या ठिकाणी ज्वलनशीर वस्तू असताना सुरक्षेची काळजी घेतली गेली होती का? सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत. प्रशासनाकडे याची उत्तरे नाहीत. कुठेतरी कठोर निर्णय घेण्याची नितांत गरज आहे, असे सीमाताई सावळे यांनी म्हटले आहे.