आयुक्त बदलले आणि पॉलिसी’ बदलली; निगडी पुलाखालील खाऊगल्ली बंद

0
416

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून निगडीतील टिळक चौक, सावली हॉटेल परिसरातील विक्रेत्यांसाठी निगडी उड्डाणपुलाखाली हॉकर्स झोन, खाऊ गल्ली निर्माण करण्यात आल्याने चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली. विक्रेत्यांना हक्काची जागा मिळाली होती. मात्र ‘आयुक्त बदलले आणि पॉलिसी’ बदलली असा काहीसा प्रकार झाला. विक्रेत्यांना लाईट,वीज, पाणी व सुरक्षारक्षक, स्वच्छतागृह देण्यास महापालिका आयुक्त, अ क्षेत्रीय अधिकारी यांनी नकार दिल्याने सर्व विक्रेत्यांना पुन्हा रस्त्यावरती मूळ जागेवर आपला व्यवसाय सुरू केला आहे.

निगडी टिळक चौक परिसरातील विक्रेत्यांमुळे सायंकाळच्या वेळी वाहतूक कोंडीत भर पडत होती. त्यामुळे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील , अ क्षेत्रिय अधिकारी शितल वाकडे, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे पदाधिकारी यांच्याशी झालेल्या बैठकीनुसार उड्डाणपुलाखाली जागा देण्याचे नियोजन करण्यात आले.
त्यानुसार फेरीवाल्यांना जागा देण्यात आली. खाऊ गल्लीचे 17 ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात आले. विक्रेत्यांना हक्काची जागा मिळाली होती. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली. परंतु, पुलाखालील विक्रेत्यांना पालिकेकडून मागणी करूनही सोई – सुविधा दिल्या नाहीत. त्यासाठी 10 सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात आले. त्यावर महापालिका आयुक्त शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी ‘मी पहातो , सांगतो’ असे उत्तर दिले. प्रशासनासोबतच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सोई सुविधा देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे विक्रेत्यांनी मूळ रस्त्यावरती येण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला .

“अतिक्रमण अधिकारी व अ क्षेत्रिय अधिकारी यांनी आम्हाला दिलेले आश्वासन पाळले नाही. सोई-सुविधा दिल्या नाहीत. साधी साफसफाईही होत नाही. अंधारात व्यवसाय करत आहोत. महापालिकेने आम्हाला फसवले अशा प्रकारची भावना” येथील विक्रेते इरफान चौधरी यांनी व्यक्त केली. “उड्डाणपुलाखाली पडीक जागा होती. मध्य प्राशन केलेले, जुगारी लोकांचे वास्तव्य असलेल्या जागेचा सदुपयोग करून सुंदर खाऊ गल्ली यशस्वी झाली. त्यामुळे काहींच्या पोटात आग पडली आहे. यात अडथळा निर्माण करण्याचे काम काही समाजकंटक करत असल्याचा” आरोप करत कासिम तांबोळी यांनी त्याचा निषेध केला.

काशिनाथ नखाते म्हणाले की, “निगडी प्राधिकरण परिसरातील विक्रेत्यांमुळे होत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधिकरणातील जेष्ठ नागरिक संघ इतर विविध सामाजिक संघटना यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. विक्रेत्यांना हक्काची जागा मिळावी यासाठी तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी सकारात्मक निर्णय घेतला. विक्रेत्यांना पुलाखाली जागा उपलब्ध करून दिली. पण, आताचे प्रशासन सोई-सुविधा देण्यास टाळाटाळ करत आहे. आताचे आयुक्त शेखर सिंह यांनाही काम करण्याची मोठी संधी आहे , मात्र त्यांचा अभ्यास अजून सुरूच आहे. यातच समन्वय नसल्याने पथारी, हातगाडी धारकांची हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे”.