आयुक्तांच्या हस्ते घोडेस्वारी प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन

0
244

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नव्याने सुरू होत असलेल्या जाधववाडी, चिखली येथे राष्ट्रीय घोडेस्वारी प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन आयुक्त शेखर सिंग यांच्या हस्ते दसऱ्याच्या मुहूर्तावर (दि. 24) पार पडले. यावेळी आशियाई स्पर्धा 2023 मध्ये घोडेस्वारी या खेळामध्ये सुवर्णपदक मिळवलेले व पिंपरी चिंचवड राष्ट्रीय घोडेस्वारी केंद्राचे विशेष प्रशिक्षक हृदय छेडा , भारतीय घोडेस्वारी संघातील आशिष लिमये व भारतीय सैन्य दलातील अपूर्व दाभाडे या खेळाडूंचा सत्कार आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रशिक्षण केंद्रामध्ये सहा वर्षावरील मुलांपासून व आवड असलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत सर्व जण प्रशिक्षण घेऊ शकतील.
आतापर्यंतचा घोडेस्वारी या खेळाचा या स्वरूपाचा पहिलाच उपक्रम असल्यामुळे नागरिक व खेळाडूंमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे .

या प्रशिक्षण केंद्रामध्ये देशी व विदेशी प्रजातीचे घोडे, लहान मुलांसाठी कमी उंचीचे उच्च प्रतीचे घोडे वापरण्यात येणार आहेत. त्यासोबतच महिला व मुलींसाठी महिला प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. खेळाडूंच्या सुरक्षित प्रशिक्षणाकरिता हेल्मेट जॅकेट यासारख्या गोष्टी उपलब्ध केल्या आहेत.

या प्रशिक्षण केंद्रामध्ये महानगरपालिकेच्या शाळेतील गुणवंत व प्रतिभावंत खेळाडूंची निवड करून विनामूल्य राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे खर्चिक समजला जाणारा खेळ पिंपरी चिंचवड मधील सर्वसामान्य खेळाडूंच्या आवाक्यात येणार आहे. यामुळे पिढीजात चालत आलेल्या घोडेस्वारी या खेळाला नवचैतन्य मिळून अनेक खेळाडू घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेऊन पिंपरी चिंचवड शहराचे नावलौकिक वाढणार आहे, असे संचालक हर्षवर्धन देशमुख यांनी सांगितले.