– राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांची मागणी
पिंपरी, दि. 9 (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यामुळे गेल्या वर्षभरापासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह हेच प्रशासक म्हणून गेल्या नऊ महिन्यांपासून कामकाज पाहत आहे. आयुक्त सिंह यांनी महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी चांगले प्रयत्न केले आहेत, त्याबद्दल त्यांचे कौतूक आहे. मात्र, नगरसेवक नसल्याने आयुक्त सिंह यांच्यावर जास्त जबाबदारी आहे, त्यामुळे त्यांनी आता बैठका, मिटींग सोडून कार्यालयाबाहेर पडून ‘ऑनफिल्ड’ उतरून जनतेच्या समस्या जाणून घ्याव्यात. तसेच शहरातील रखडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल बाळासाहेब काळभोर यांनी केली आहे.
याबाबत विशाल काळभोर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 12 मार्च 2022 रोजी महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपला. त्यानंतर राज्य सरकारने तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर 18 ऑगस्ट रोजी साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची महापालिका आयुक्त तथा प्रशासक म्हणून नियुक्ती केली. सिंह यांना महापालिकेत येऊन 18 एप्रिलला 8 महिने पूर्ण होतील. त्यांनी पालिकेत आल्यानंतर कर वसुलीसाठी विविध प्रयत्न केले, त्यामुळेच पालिकेच्या इतिहासात प्रथमच कर संकलन व कर आकारणी विभागाला 817 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यासह पालिकेला इतर विभागातून चांगले उत्पन्न मिळाले आहे. याबद्दल आयुक्त सिंह यांचे कौतूक आहे.
महापालिकेत नगरसेवक असताना प्रभागातील नागरिकांच्या तक्रारी, समस्या नगरसेवक सोडवत असतात. मात्र, नगरसेवक नसल्याने आयुक्त तथा प्रशासक सिंह यांच्यावर सध्या मोठी जबाबदारी आहे. त्यांनी विविध कामासाठी महापालिकेत येणाऱ्या नागरिकांना भेटीसाठी वेळ देणे गरजेचे आहे. तसेच सिंह हे शहरात आल्यापासून त्यांनी शहर फिरून पाहिले नाही. त्यामुळे त्यांनी आता बैठकांमधून थोडा वेळ काढून ‘ऑनफिल्ड उतरावे, शहर समजून घ्यावे, जनतेत मिसळावे. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा विशाल काळभोर यांनी व्यक्त केली आहे.