आयसीसी कडून टीम इंडियावर कारवाई

0
1

दि.०८(पीसीबी)-टीम इंडियाने शनिवारी 6 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. भारताने 271 धावांचं आव्हान 1 विकेट गमावून पूर्ण केलं. भारताने या विजयासह मालिका आपल्या नावावर केली. भारताने केएल राहुल याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेला 2-1 अशा फरकाने पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेने त्याआधी 3 डिसेंबरला रायपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियावर 4 विकेट्सने मात केली होती. भारताला त्या सामन्यात 358 धावा करुनही पराभूत व्हावं लागलं होतं. त्या सामन्यात टीम इंडियाकडून एक मोठी चूक झाली होती. त्यामुळे आता आयसीसीने टीम इंडियावर कारवाई केली आहे.

टीम इंडियाला रायपूरमध्ये निर्धारित वेळेत 50 ओव्हर पूर्ण करण्यात अपयश आलं. टीम इंडियाला निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ लागला. त्यामुळे आयसीसीने टीम इंडियावर स्लो ओव्हर रेटमुळे दंडात्मक कारवाई केली आहे. टीम इंडियावर सामन्याच्या एकूण मानधनातील 10 टक्के रक्कम ही दंड म्हणून द्यावी लागली आहे. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.