आयपीएलची स्पर्धा स्थगित; बीसीसीआयने जाहीर केला निर्णय

0
4

दि . ९ ( पीसीबी ) – भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय (BCCI) मोठा निर्णय घेतला आहे. सध्या सुरु असलेले आयपीएलचे (IPL 2025) उर्वरित सामने स्थगित (IPL suspended) करण्यात निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. आयपीएलचे एकूण 16 सामने शिल्लक होते. हे 16 सामने आता नंतर खेळवण्यात येतील. मात्र हे सामने नक्की कधी खेळवण्यात येतील, याबाबत बीसीसीआयकडून माहिती देण्यात आलेली नाही.

पाकिस्तानकडून 8 तारखेच्या रात्री भारतावर ड्रोन हल्ले करण्यात आले. त्यामुळे धर्मशाला इथे सुरु असलेला पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना मध्येच थांबवण्यात आला होता. त्यानंतर रात्रभर भारताची धडक कारवाई, पाकिस्तानकडून अधून मधून होणारे हल्ले, या पार्श्वभूमीवर आता बीसीसीआयकडून आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आयपीएलमध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. 22 मार्चपासून सुरु झालेल्या आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना 25 मे रोजी कोलकात्यातली ईडन गार्डन्स मैदानावर खेळवण्याचं नियोजित होतं. मात्र आता या सर्व स्पर्धेवर टांगती तलवार आहे. दरम्यान, तिकडे पाकिस्तानात झालेल्या हल्ल्यांनी पाकच्या क्रिकेट लीगवरही परिणाम झाला आहे. पाकिस्तानच्या रावळपिंडी मैदानावर ड्रोन हल्ला झाला होता. त्यामुळे PSL चे सामने रद्द केले होते. आता PSL चे उर्वरित सामने दुबईत खेळवण्यात येणार आहे.

परेदशी खेळाडूंच्या सुरक्षेचा निर्माण झाला प्रश्न-

पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्री भारताच्या सीमावर्ती भागात हवाई हल्ले केले होते. त्यानंतर भारतीय सैन्याने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानातील प्रमुख शहर आणि कराची बंदरावर हल्ला केला होता. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. आयपीएलमधील सर्व संघांमध्ये अनेक परदेशी खेळाडू आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद चिघळल्याने या परेदशी खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कालच हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील पंजाब विरुद्ध दिल्लीचा सामान पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यानंतर थांबवण्यात आला होता. यापुढील काळातही अशीच समस्या येऊ शकते. त्यामुळे आयपीएल स्पर्धा तुर्तास थांबवून उर्वरित आयपीएलची स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.