आयटी मधील मुलिचा धारदार शस्त्राने कोणी केला खून

0
12

पुणे, दि .8 पीसीबी) – पुण्यातील येरवडा भागात एका तरुणीवर तिच्याच सहकाऱ्याने धारधार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात अधिक रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत तरुणीचे नाव शुभदा कोदारे (वय 26) असून ती एका आयटी कंपनीत अकाउंट विभागात कार्यरत होती.

काल (मंगळवारी) सायंकाळी शुभदा तिच्या कामाचा दिवस संपवून कंपनीच्या पार्किंगमध्ये गाडीकडे जात होती. याच वेळी कृष्णा कनोजा नावाचा तिचा सहकारी, ज्याच्यासोबत तिचा आर्थिक वाद होता, तिथे आला. कृष्णाच्या हातात भाजी कापण्यासाठी वापरण्यात येणारा चॉपर होता. त्याने शुभदावर अचानक हल्ला करत तिच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर वार केला.

हल्ल्याचा घाव इतका गंभीर होता की शुभदा जागेवरच कोसळली. कंपनीतील सहकाऱ्यांनी तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र गंभीर रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. प्राथमिक तपासात उघड झाले की शुभदा आणि कृष्णा हे एकमेकांच्या ओळखीचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात आर्थिक देवाणघेवाण झाली होती. पैशांच्या वादातूनच कृष्णाने ही हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

शुभदाच्या बहिणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कृष्णा कनोजा याला अटक केली आहे.
त्याच्यावर १०३(१) बीएनएस ४, २५ हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी कंपनीतील इतर सहकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. तसेच शुभदा आणि कृष्णा यांच्यातील वादाचे स्वरूप आणि या प्रकरणातील आणखी काही लोकांचा सहभाग असल्यास तपास सुरू आहे. शुभदाच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास येरवडा पोलिस करीत आहेत.