पुणे: नागरिकांच्या सुरक्षेची आणि रक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांचं एक धक्कादायक कांड पुण्यात समोर आलं आहे. यात एका २४ वर्षीय आयटी तरुण-तरुणीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि नोकरी घालवण्याची धमकी देण्यात आली. धमकी देत त्याच्याकडून पैसे उकळणाऱ्या वाघोली पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांना आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले आहे. पोलीस हवालदार किरण अब्दागिरे, पोलीस शिपाई गणेश खाडे आणि किरण कांबळे अशी निलंबन झालेल्यांची नावे आहेत.
२ एप्रिल रोजी रात्री वाघोलीतील एका सोसायटीत काही तरुण मुली आणून व्हिडिओ तयार केले जात असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली होती. या माहितीवरून बिट मार्शल म्हणून गस्त घालत असलेले गणेश खाडे आणि किरण कांबळे तिथे पोहोचले. त्यांनी तिथल्या एका तरुण-तरुणीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
कायदेशीर कारवाईऐवजी खंडणीचा मार्ग
पोलीस ठाण्यात आल्यावर कर्तव्य बजावण्याऐवजी या तिघांनी मिळून तरुणाला धमकावण्यास सुरुवात केली. “तुझ्यावर सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल करू, तुझी नोकरी जाईल आणि नातेवाइकांना बोलावू,” अशी भीती हवालदार किरण अब्दागिरे यांनी दाखवली. पोलीस शिपाई गणेश खाडे याने तरुणाला चापटी मारून दहशतीखाली ठेवले. यासोबतच तरुणीला पोलीस ठाण्यात उभे ठेवून तिच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला.
‘
हा प्रकार मिटवण्यासाठी पोलिसांनी तरुणाकडे पैशांची मागणी केली. अखेर एका गॅरेजच्या नावाचा ‘फोन पे’ क्यूआर कोड दाखवून १० हजार रुपये उकळले. मात्र, पोलिसांच्या संशयास्पद हालचालींमुळे तरुणाने या प्रकरणाची चौकशी केली आणि सत्य समोर आले. पैसे उकळण्याच्या उद्देशाने हे सगळं केल्याचं समोर आलं.
हा गैरप्रकार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर जाताच, त्यांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीत तथ्य आढळल्यानंतर, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी तिन्ही कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.











































