नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत तरुणींचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आलेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण अत्यंत ‘धक्कादायक आणि गंभीर’ असल्याचे म्हटले आहे.आतापर्यंत आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन आणि तौसिफ अत्तार या पाच संशयितांना अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे सर्व आरोपी स्थानिक असले, तरी त्यांचे धागेदोरे एखाद्या बाहेरील कट्टरपंथी संघटनेशी जोडलेले आहेत का? याचा तपास सध्या सुरू आहे.
या प्रकरणावर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणलेले आहे. एका टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये अशा प्रकारे दबाव आणून धर्मांतर आणि लैंगिक शोषण केले हे फारच धक्कादायक आहे. मी पोलिसांचे कौतुक करेन की त्यांनी अतिशय वेगाने कारवाई करून या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.”
नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणींना लक्ष्य करून एक मोठे षडयंत्र रचले गेल्याचा संशय आहे. बेरोजगार तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना कंपनीत भरती केले जात असे. त्यानंतर ‘टीम लीडर्स’ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचे लैंगिक शोषण केले जात होते. हिंदू देव-देवतांबद्दल आक्षेपार्ह विधानं करून आणि एका विशिष्ट धर्माची श्रेष्ठता पटवून देऊन तरुणींचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जात होता. पीडित तरुणींनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर धर्मांतरासाठी सातत्याने दबाव टाकला जात होता. एका पीडितेच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी गोपनीय तपास केला आणि हे मोठे रॅकेट उघड झाले.











































