आयकर रिटर्न भरणाऱ्या लोकांची संख्या गेल्या 10 वर्षात दुपटीने वाढून 7.78 कोटी

0
193

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – देशात आयकर रिटर्न अर्थात आयटीआर भरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आयकर रिटर्न भरणाऱ्या लोकांची संख्या गेल्या 10 वर्षात दुपटीने वाढून 7.78 कोटी झाली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) मंगळवारी ही आकडेवारी जाहीर केली.

CBDT ने सांगितले की 2022-23 या आर्थिक वर्षात 7.78 लाख आयकर रिटर्न भरले गेले. हे रिटर्न 2013-14 मध्ये दाखल केलेल्या 3.8 कोटी आयकर रिटर्नपेक्षा 104.91 टक्के अधिक आहे. याच कालावधीत, 2022-23 मध्ये निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 160.52 टक्क्यांनी वाढून 16,63,686 कोटी रुपये झाले. 2013-14 मध्ये ते 6,38,596 कोटी रुपये होते.

एकूण प्रत्यक्ष कर संकलन 173 % ने वाढले
सरकारने 2023-24 च्या अर्थसंकल्पात प्रत्यक्ष कर (वैयक्तिक आयकर आणि कंपनी कर) मधून 18.23 लाख कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या आर्थिक वर्षात जमा झालेल्या 16.61 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण 9.75 टक्के अधिक आहे.

CBDT डेटानुसार, 2022-23 मध्ये एकूण प्रत्यक्ष कर संकलन 173.31 टक्क्यांनी वाढून 19,72,248 कोटी रुपये झाले. 2013-14 या आर्थिक वर्षात ते 7,21,604 कोटी रुपये होते. यासह, प्रत्यक्ष कर-जीडीपी गुणोत्तर 5.62 टक्क्यांवरून 6.11 टक्के झाले आहे. संकलन खर्च 2013-14 मध्ये 0.51 टक्क्यांवरून 2022-23 मध्ये 0.57 टक्क्यांपर्यंत वाढला.

अर्थसंकल्पाकडून करदात्यांच्या काय अपेक्षा आहेत?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात कोणतीही मोठी घोषणा होण्याची शक्यता नसली तरी करदात्यांच्या अनेक अपेक्षा आहेत.
सरकारने जुनी करप्रणाली थांबवू नये आणि करमुक्त स्लॅबची मर्यादा वाढवावी, अशी करदात्यांची मागणी आहे. याशिवाय कलम 80D अंतर्गत कपातीची मर्यादा वाढवण्याचीही मागणी आहे.