आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंच्या अडचणी वाढणार ?

0
401

नागपूर,दि.२२(पीसीबी) – आपल्या कार्यपद्धतीमुळे नेहमी चर्चेत राहणारे डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, नागपूर येथे महापालिका आयुक्तपदी असताना तुकाराम मुंढे यांच्यावर एका महिलेच्या तक्रारीची दखल न घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

तुकाराम मुंढे यांच्यावर कंत्राटदाराला दिलेलं 20 कोटींचे नियमबाह्य काम आणि महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे दफ्तर दिरंगाई कायद्यानुसार तुकाराम मुंढे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. कंत्राटदार आणि महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवर तीन वर्षात कारवाई न झाल्याने याला जवाबदार कोण? अशी विचारणा करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश माहिती आयुक्त यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर तुकाराम मुंढे हे अनेकदा चर्चेत आले होते. कारण, नागपूर महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या होत्या. याशिवाय बेजबाबदार अधिकाऱ्यांची त्यांनी कानउघडणी देखील केली होती. तुकाराम मुंढे यांनी केलेल्या कठोर उपाययोजनांमुळे त्यांच्यावर काही जणांकडून टीका झाली होती. दरम्यान, एका महिलेने केलेल्या आरोपानंतर तसेच सतत होणाऱ्या टीकेमुळे नागपूर महापालिका आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात करण्यात आली होती. यानंतर त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये तुकाराम मुंढे यांनी खळबळजनक आरोप केले होते.

‘मी नेमका काय गुन्हा केला होता की, माझी बदली करण्यात आली’ असा थेट सवालही तुकाराम मुंढे यांनी उपस्थित केला होता. सगळ्यात धक्कादायक म्हणजे, ‘नागपुरात माझ्याविरोधात काही मिळेना म्हणून माझ्या चारित्र्याहननाचे प्रकार करण्यात आले. महिलांना माझ्याकडे आणून कपडे फाडण्याचे प्रकार घडवले गेले’, असा धक्कादायक खुलासा तुकाराम मुंढे यांनी केला होता.