आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलं नाही – अजितदादा समर्थकांचा इशारा

0
62

नागपूर, दि. 08 (पीसीबी) : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत सध्या जागा वाटपावरून चर्चा सुरु आहे . त्यातच नागपूर भाजपचे अध्यक्ष जितेंद्र उर्फ बंटी कुकडे यांनी नागपूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व 12 जागा भाजपच (BJP) लढवेल असा दावा केला होता. त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा भडका उडाल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची नागपुरात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत नागपूर भाजपच्या एकला चलोच्या धोरणाची तक्रार पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे ठरवण्यात आले. आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलं नाही, जे आम्ही भाजपचा काम करू, आमचं पक्ष ठरवेल की आम्ही कोणाचं काम करणार, असं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील सर्व जागा लढवण्याचा भाजपचा निर्धार महायुतीत नव्या वादाचा कारण बनत असल्याचे चित्र आहे.

काय म्हणाले राष्ट्रवादीचे पदाधिकारी?
भाजपचे नागपूर शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे म्हणाले होते की, नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीणमधील सर्व 12 विधानसभा मतदारसंघात भाजप निवडणूक लढवणार असून मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आमचं काम करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष असून त्याचे नेतृत्व अजित पवार व प्रफुल पटेल करत आहे. आम्ही दुसऱ्याच्या दावणीला बांधलेलं नाही, मग हे कसं म्हणतात की आमचं (भाजपचं) काम करा. आमचं नेतृत्व ठरवेल की आम्ही कोणाचा काम करायचे. महायुतीत चर्चा सुरू आहे की, जिथे भाजपचे आमदार नाही तिथे मित्र पक्षांना जागा दिली जाईल म्हणून आम्ही पश्चिम नागपूर, उत्तर नागपूर आणि काटोल या तीन जागांची मागणी केली आहे, असे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

तीन विधानसभा मतदारसंघ आम्हाला मिळावे
या तिन्ही ठिकाणी आमची संघटन शक्ती आहे. हे तिन्ही जागा आम्ही मागितल्या शिवाय राहणार नाही, आम्ही नागपूर भाजपची आमच्या वरिष्ठांकडे तक्रार करू. भाजपचे आमदार असलेल्या 110 ठिकाणी आम्ही भाजपला मदत करणार आहोत. लोकसभा निवडणुकीत आम्ही नितीन गडकरी यांचे ही मेहनतीने काम केले. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.