आम्ही कोथरूडचे भाई आहोत, म्हणत तिघांना बेदम मारहाण

0
194

कार मधून जाणाऱ्या दोघांना अडवून त्यांना ‘आम्ही कोथरूडचे भाई आहोत’ अशी धमकी देत कोयता आणि पालघनने मारून जखमी केले. हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तिसऱ्या तरुणाला देखील मारहाण करून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 23) मध्यरात्री साडेबारा वाजता ईडन चौक, वाकड येथे घडली.

अभिषेक चंद्रशेखर रोकडे (वय 32, रा. नवी सांगवी), सनी प्रदीप कलाटे (वय ३४), अक्षय कलाते अशी जखमींची नावे आहेत. अभिषेक यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आठ अनोळखी लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक आणि त्यांचा मित्र सनी हे कारमधून जात होते. ईडन चौक वाकड येथे पाठीमागून हॉर्न वाजवत आलेल्या एका कारमधून आरोपी आले. त्यांनी अभिषेक यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. दरम्यान अभिषेक यांचा मित्र भांडण सोडविण्यासाठी आला असता आरोपींनी अभिषेक आणि त्यांच्या दोन्ही मित्रांना ‘तुम्हाला माहिती आहे का, आम्ही कोण आहोत. आम्ही कोथरूडचे भाई आहोत’ अशी धमकी दिली. त्यानंतर कोयता आणि पालघनने तिघांना मारून शिवीगाळ करत आरोपी पळून गेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.