आम्हीच खरी शिवसेना मग मैदान कोणतही असो – एकनाथ शिंदे

0
411

मुंबई दि. ३ (पीसीबी) – मुंबईत यंदा शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होत आहेत. दोन्ही गटाने आम्हीच ओरिजिनल शिवसेना असल्याचा दावा केला आहे. शिवाजी पार्कात उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. तर बीकेसीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबोधित करणार आहेत. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. आम्हीच खरी शिवसेना आहोत. आमच्याकडे आकडे आहेत. आम्हीच बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे आहोत, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीटीव्हीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आम्हीच खरी शिवसेना असल्याचा पुनरुच्चार केला. मी दसरा रॅलीची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. या रॅलीला महाराष्ट्रभरातून हजारो लोक येणार आहेत. राज्यभरातून येणाऱ्या या लोकांना कोणताही त्रास होऊ नये. ते आरामशीर यावेत आणि जावेत यासाठी संपूर्ण विभागाचे लोक काम करत आहेत. उद्या तयारी पूर्ण होईल. ही रॅली यशस्वी होईल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

मैदान कोणतेही असो. त्याने फरक पडत नाही. विचार महत्त्वाचे आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे घेऊन जात आहोत. त्यांची भूमिका पुढे नेत आहोत. त्यामुळेच आमच्यासोबत लोक येत आहेत. पाठिंबा देत आहेत. मी जिथे जिथे जातो, तिथे लोकांना भेटतो. त्यांची भावना समजून घेतो. त्यावेळी आमची भूमिका योग्यच होती हे दिसून येते, असंही ते म्हणाले.

लोकशाहीत संविधान आहे. त्यानुसार गोष्टी घडत असतात. लोकशाहीत बहुमत महत्त्वाचं असतं. आमच्याकडे ५५ पैकी ४० आमदार आहेत. १० अपक्ष आमदारही आहेत. अपक्षांना सोडा. पण ५५ पैकी ४० आमदार आमच्याकडे आहेत. १८ पैकी १२ खासदार आमच्यासोबत आहेत.

देशातील १४ राज्यांचे प्रमुख आमच्यासोबत आहेत. लाखो लोक आमच्यासोबत आहेत. त्यावरून आमच्याकडे बहुमताचा आकडा असल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत हे दिसून येतं, असंही ते म्हणाले.