आम्हाला १२ ते १५ जागा सोडा, अन्यथा … – रामदास आठवलेंची मागणी

0
90
  • पुण्यातील कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी, पिंपरी या विधानसभा मतदारसंघावर आरपीआय दावा

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) मुंबई, : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू आहे. नेत्यांचे मेळावे, सभा सुरू असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये इतर पक्षांच्या वाटाघाटी सुरू असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला विचारात घेत नसल्याची खंत व्यक्त करीत लोकसभेला आम्ही जुळवून घेतले परंतु विधानसभेला आम्हाला १२ ते १५ जागा सोडाव्यात, जर आमची मागणी पूर्ण केली नाही तर आंबेडकरी जनतेत रोष वाढेल असे सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीचे टेन्शन वाढवले आहे.


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलेली असताना रामदास आठवले यांनीही एक पाऊल पुढे टाकून येत्या २५ ऑगस्ट रोजी कार्यकर्ता मेळावा घेऊन विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची तयारी केली आहे. कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून विधानसभेचे डावपेच आठवले आखणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी आम्हाला ऊस धारक हे शेतकरी चिन्ह मिळालेले आहे. म्हणून आम्ही या पुढच्या निवडणुका ऊस धारक शेतकरी या चिन्हावर लढवणार आहोत. पुण्यातील कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी, पिंपरी या विधानसभा मतदारसंघावर आरपीआय दावा ठोकणार आहे. लोकसभा निवडणुकीला आम्ही प्रमुख पक्षांशी जुळवून घेतले. परंतु विधानसभा निवडणुकीला मात्र आमचा विचार केला जावा, अशी आग्रही मागणी आठवले यांनी केली आहे.
लोकसभेला देशव्यापी नेतृत्वाचा विचार करून आम्ही एक पाऊल मागे घेतलेले होते. परंतु विधानसभेला आम्हाला जागा दिल्या नाहीत तर आंबेडकरी जनतेत रोष वाढेल आणि पर्यायाने महायुतीला फटका बसेल, असा इशारा आंबेडकर यांनी महायुतीला दिलाय.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यात लोकप्रिय ठरत आहे. या योजनेच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे आहेत. या सगळ्या नेत्यांच्या छायाचित्राबरोबरच आपलाही फोटो असावा अशी इच्छा रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.