“आम्हाला दूर केलं नसतं, तर हे घडलं नसतं”खासदार भावना गवळी

0
255

मुंबई दि. २३ (पीसीबी) – वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी शिवसेनेतील बंडखोरीवरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आम्हाला दूर केलं नसतं, भेटीगाठी नाकारल्या नसत्या, तर हे घडलं नसतं”, असं खासदार गवळी यांनी म्हटलं आहे. एका हाताने टाळी वाजत नाही, कोण चुकलं यावर समोरच्यांनी देखील आत्मचिंतन केलं पाहिजे, असे त्या वाशिममध्ये बोलताना म्हणाल्या.

आम्ही शिवसेनेमध्येच आहोत, असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. विदर्भात काँग्रेस विरोधात शिवसेनेनं टक्कर दिली. या भागात आम्ही सेनेला वाढवल्याचंही त्या म्हणाल्या. दरम्यान, राज्यातील सत्तानाट्यानंतर खासदार भावना गवळी सोमवारी मतदारसंघात दाखल झाल्या आहेत. शिवसेनेकडून शहरात भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या फलकांवरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या फलकांवर भाजपच्या नेत्यांचेच छायाचित्र अधिक असल्यामुळे शिवसेना शिंदे गट भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

खासदार भावना गवळी यांच्या संस्थेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यानंतर गवळी यांच्या संस्थांवर ‘ईडी’ने कारवाईदेखील केली होती. त्यानंतर खा. गवळी यांच्या विरोधात भाजपने रान उठविले होते.

दरम्यान, जळगावच्या धरणगावमध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी एका सभेत बंडखोरांवर निशाणा साधला होता. बंडखोरांचा मुखवटा लवकरच फाडणार, असं विधान ठाकरे यांनी केलं होतं. शिवसेनेला, ठाकरे कुटुंबियांना संपवण्याचे घाणेरडे राजकारण सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबाला एकटे पडू देऊ नका, असं आवाहन ठाकरेंनी या सभेत केलं होतं.